Women's World Cup 2025 : वर्ल्डकसाठी 3 संघ पात्र! बांगलादेश-श्रीलंका सामन्यानंतर स्कोअरबोर्डमध्ये फेरबदल
महिला विश्वचषक 2025 मधील 21 व्या सामन्यात बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात प्रचंड चुरशीची लढत रंगली. अखेरच्या काही चेंडूंवर रंगलेला हा सामना श्रीलंकेने केवळ 7 धावांनी जिंकत बांगलादेशचा स्पर्धेतील प्रवास थांबवला. एकवेळ अशी परिस्थिती होती की बांगलादेशला फक्त 12 चेंडूत 12 धावा हव्या होत्या, मात्र शेवटच्या दोन षटकांतील विकेट्सच्या पावसाने सामना पूर्णतः पलटला. 49 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर पाचवी विकेट पडल्यावर बांगलादेश 193 धावांवर होता, परंतु पुढील काही क्षणांतच उर्वरित फलंदाजांनी गडी गमावल्याने संघ 194 धावांवर सर्वबाद झाला.
या विजयामुळे श्रीलंकेने गुणतालिकेत महत्त्वाची झेप घेतली, तर बांगलादेश स्पर्धेबाहेर पडला. सध्या ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे तीन संघ उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करून पुढे गेले आहेत. चौथ्या स्थानासाठी मात्र भारत, न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीव्र स्पर्धा सुरू आहे.
ऑस्ट्रेलिया 9 गुणांसह अव्वल स्थानावर असून त्यांचा नेट रनरेट +1.818 इतका प्रभावी आहे. इंग्लंड दुसऱ्या स्थानावर असून त्याने भारतावर 4 धावांनी नाट्यमय विजय मिळवला आणि उपांत्य फेरी गाठली. दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना गमावूनही सलग चार विजय मिळवत पुनरागमन केले.
भारताने पाच सामन्यांपैकी दोन विजय आणि तीन पराभव नोंदवले असून पुढील दोन्ही सामने जिंकणे त्यांच्यासाठी अत्यावश्यक आहे. न्यूझीलंडविरुद्धचा सामना निर्णायक ठरणार असून त्याच्यावर भारताच्या सेमीफायनल आशा अवलंबून आहेत. या पार्श्वभूमीवर भारत–न्यूझीलंड सामना संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक थरारक लढत ठरण्याची चिन्हे आहेत.