Kieron Pollard : 6,6,0,6,6,6,6,6,6… 29 चेंडूत पोलार्डचा रौद्र अवतार! त्याच्या फटकेबाजीने गोलंदाजांची धांदल उडाली
कॅरिबियन प्रीमियर लीग 2025 च्या 19व्या सामन्यात त्रिनबागो नाइट रायडर्सचा अनुभवी खेळाडू कायरन पोलार्डने सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सविरुद्ध तुफानी फलंदाजी साकारली. केवळ 29 चेंडूत त्याने 65 धावा ठोकत मैदान गाजवलं. पोलार्डच्या या खेळीत तब्बल 8 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. सुरुवातीला तो 13 चेंडूत फक्त 12 धावांवर खेळत होता, पण त्यानंतर पुढील काही चेंडूत सलग षटकारांची आतषबाजी करून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली.
त्रिनबागोची डळमळीत सुरुवात झाल्यानंतर पोलार्ड आणि निकोलस पूरन यांची भागीदारी संघाला आधार देणारी ठरली. चौथ्या विकेटसाठी या दोघांनी मिळून 90 धावांची भागीदारी रचली. पूरनने 38 चेंडूत 52 धावा केल्या, तर पोलार्डने एकट्याने गोलंदाजांचा धुव्वा उडवला. एका षटकात त्याने तीन षटकार ठोकले, तर दुसऱ्या षटकात सलग चार षटकार लगावून अर्धशतक पूर्ण केलं.
या खेळीच्या जोरावर त्रिनबागो नाइट रायडर्सने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावत 179 धावा केल्या. डॅरेन ब्राव्होने 21 आणि कॉलिन मन्रोने 17 धावा करून योगदान दिलं. दुसरीकडे पॅट्रियट्सकडून जेसन होल्डरने 2 विकेट्स घेतल्या, पण पोलार्डच्या आक्रमक फटक्यांसमोर कोणताही गोलंदाज टिकू शकला नाही.