India vs Pakistan
India vs Pakistan

India vs Pakistan : आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला

पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 128 धावांचं आव्हान दिलं होतं

आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

(IND vs PAK) आशिया कप 2025 च्या गट सामन्यात भारताने पाकिस्तानला 7 विकेट्सनी पराभूत करत दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. आज भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले होते. पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 128 धावांचं आव्हान दिलं होतं. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत फक्त 127 धावा केल्या. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी सहज खेळ करत हे लक्ष्य पूर्ण केलं. कर्णधार सूर्यकुमार यादव नाबाद 47 धावांसह संघाचा नायक ठरला.

सामन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानने आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय गोलंदाजांनी त्यांची मोर्चेबांधणी कोलमडून टाकली. हार्दिक पांड्याने पहिल्याच ओव्हरमध्ये धोकादायक फलंदाज सॅम अयुबला बाद केलं. जसप्रीत बुमराहने दुसऱ्या बाजूने दबाव वाढवत मोहम्मद हॅरिसला माघारी पाठवलं. सुरुवातीच्या या दोन धक्क्यांमुळे पाकिस्तानचा डाव डळमळीत झाला. कुलदीप यादवने फिरकीच्या जाळ्यात पाकिस्तानच्या फलंदाजांना अडकवलं. त्याने तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याचप्रमाणे अक्षर पटेलनेही आपली फिरकीची जादू दाखवत फखर जमान आणि कर्णधार सलमान आगा यांना माघारी धाडलं. बुमराह, हार्दिक, कुलदीप आणि अक्षर यांच्या अचूक माऱ्यामुळे पाकिस्तानचा डाव 9 बाद 127 वर थांबला.

127 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी भारताच्या डावाची सुरुवात अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी केली. शुभमन गिल 10 धावांवर बाद झाला, परंतु अभिषेक शर्माने आक्रमक खेळी करत संघाला चांगली गती दिली. त्याने केवळ 13 चेंडूत 31 धावा काढल्या, ज्यामध्ये 2 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे त्याने पाकिस्तानचा मुख्य गोलंदाज शाहीन आफ्रिदीला दोन वेळा षटकार मारले. ओपनर्स बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा मैदानात उतरले. या दोघांनी स्थिरतेने खेळ करत अर्धशतकी भागीदारी केली. तिलक वर्माने 31 धावांची खेळी केली. मात्र, तो बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्याने 47 नाबाद धावा करत शेवट षटकाराने सामना संपवला आणि भारताला विजय मिळवून दिला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com