Asia Cup 2025 IND vs PAK : टॉस जिंकला म्हणजे सामना जिंकला! भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी दुबईच्या मैदानाचे गूढ जाणून घ्या
एशिया कप 2025 चा रोमांच आज कळसाला पोहोचणार आहे. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात थरारक सामना रंगणार असून या लढतीचा निकाल थेट ‘सुपर-4’च्या शर्यतीवर परिणाम करणार आहे. विशेषत: पाकिस्तानसाठी हा सामना अस्तित्वाचा प्रश्न ठरणार आहे, कारण भारताविरुद्ध पराभव झाल्यास त्यांच्या स्पर्धेबाहेर जाण्याची शक्यता अधिक वाढेल.
पाकिस्तानने ओमानविरुद्ध पहिल्या सामन्यात 93 धावांनी विजय मिळवत चांगली सुरुवात केली होती. परंतु भारताविरुद्धचा सामना हरल्यास त्यांच्या खात्यात फक्त दोनच गुण राहतील. त्यानंतर 17 सप्टेंबर रोजी होणारा यूएईविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहे. यूएईने ओमानवर विजय मिळवला तर त्यांच्याकडे चार गुण जमा होतील. अशावेळी पाकिस्तानला हरवून यूएई सुपर-4 मध्ये प्रवेश करू शकते आणि पाकिस्तान फक्त दोन गुणांसह बाहेर फेकला जाईल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने नेहमीच हाय-व्होल्टेज असतात. मैदानावरील तणाव, खेळाडूंचे दडपण आणि चाहत्यांचा प्रचंड उत्साह यामुळे हा सामना केवळ लीग टप्प्यातील नसून अस्तित्वाच्या लढतीसारखा भासतो. पाकिस्तानसाठी हा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे, अन्यथा ‘सुपर-4’चे तिकीट हातातून निसटेल.
सध्या ग्रुप-‘अ’मध्ये भारत एक विजयासह अव्वल स्थानावर असून त्यांचा नेट रन रेट 10.483 इतका आहे. पाकिस्तान दोन गुण आणि 4.650 च्या नेट रन रेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. ओमान आणि यूएई या दोन्ही संघांचा पराभव झाल्याने ते अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.