IND vs ENG : कॅच निसटला आणि सामना फसला! पंतच्या झेलाचा इंग्लंडला फटका

IND vs ENG : कॅच निसटला आणि सामना फसला! पंतच्या झेलाचा इंग्लंडला फटका

कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंतचा सोपा झेल जॅक क्रॉलीने सोडल्यामुळे सामना इंग्लंडच्या हातून निसटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

दुसऱ्या डावात शुभमन गिलने शानदार 161 धावांची खेळी केली, तर ऋषभ पंतने 65 धावा झळकावल्या. पंत 11 धावांवर असताना जॅक क्रॉलीने मिड-ऑफवर त्याचा सोपा झेल सोडला आणि त्यानंतर पंतने आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव आणला. त्याने शोएब बशीरच्या गोलंदाजीवर अनेक चौकार व षटकारांची आतिषबाजी केली आणि भारताचा डाव मजबूत केला.

पंत आणि गिलच्या भागीदारीने भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. कसोटी सामन्यादरम्यान पंतची फलंदाजी नेहमीच आक्रमक पाहायला मिळाली आहे. याही सामन्यात त्याने त्याची झलक दाखवली. मात्र ऋषभ पंतचा सोपा झेल जॅक क्रॉलीने सोडल्यामुळे सामना इंग्लंडच्या हातून निसटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, पहिल्या डावातही पंतचा झेल क्रॉलीनेच सोडला होता. दरम्यान भारताने दुसऱ्या डावात 6 बाद 427 धावांवर डाव घोषित करून इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचे अवाढव्य लक्ष्य ठेवले आहे.

तसेच, इंग्लंडला प्रत्युत्तरात सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. अवघ्या 50 धावांवर त्यांनी तीन प्रमुख विकेट गमावल्या. मोहम्मद सिराजने जॅक क्रॉलीला खाते न उघडताच बाद केले. तर आकाश दीपने बेन डकेट आणि जो रूटला माघारी धाडले. सध्या इंग्लंड अडचणीत असून, भारतीय गोलंदाजांनी त्यांना दडपणात आणले आहे. सामना भारताच्या नियंत्रणात आहे आणि इंग्लंडला पराभव टाळण्यासाठी चमत्काराची गरज आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com