MPL 2025 : कोल्हापूर टस्कर्स संघाचा निर्धार! श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा आशीर्वाद घेत विजेतेपदासाठी सज्ज
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 च्या तिसऱ्या हंगामात कोल्हापूर टस्कर्स संघ पुन्हा एकदा मैदानात जोमाने उतरणार आहे. पुण्याचे युवा उद्योजक आणि ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांच्या मालकीचा हा संघ यंदा चषकावर नाव कोरण्याच्या निर्धाराने सज्ज झाला आहे. सामन्याआधी, खेळात यश मिळावे यासाठी संघाने आधी श्रींच्या चरणी नतमस्तक होण्याचा मार्ग निवडला. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती – श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती यांचे दर्शन घेत, आरती करून, कोल्हापूर टस्कर्सने आपल्या मोहिमेला शुभारंभ केला.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग ही 'आयपीएल'च्या धर्तीवर सुरु झालेली स्पर्धा असून अल्पावधीतच ती राज्यातील महत्त्वाची क्रिकेट लीग बनली आहे. कोल्हापूर टस्कर्सने यापूर्वी सलग दोन हंगामांमध्ये दमदार कामगिरी केली असून पहिल्याच वर्षी उपविजेतेपदही पटकावले होते. यंदाच्या मोसमात हा संघ आणखी भक्कम आणि संतुलित झाल्याचे दिसून येत आहे. कर्णधार राहुल त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली अंकित बावणे, श्रीकांत मुंढे यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा संघात समावेश आहे.
कर्णधार राहुल त्रिपाठी म्हणाले:
“यंदा आमचा संघ अतिशय संतुलित आहे. सर्व खेळाडूंवर माझा पूर्ण विश्वास आहे. आम्ही या हंगामात विजेतेपद निश्चित मिळवू, याच निर्धाराने खेळणार आहोत. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले आहेत, ते आमच्या संघासाठी यशदायक ठरतील.” कोल्हापूर टस्कर्सचा पहिला सामना शनिवार (उद्या) होणार असून, त्यांची तयारी आणि आत्मविश्वास पाहता यंदा हे विजेतेपद मिळवण्याची शक्यता निश्चितच अधिक आहे.