Asia Cup 2025 PAK vs UAE : पाकिस्तानी क्रिकेट टीम आशिया चषकातून बाहेर? PAK vs UAE सामना रद्द होण्याच्या चर्चांनंतर खळबळ
आशिया कप स्पर्धेतील पाकिस्तान आणि युएई यांच्यातील 10 वा सामना बऱ्याच कारणाने चर्चेत आला आहे. पाकिस्तान आणि युएई यांच्यातील सामना होईल की नाही याबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. यामगचं कारण असं की, भारत-पाकिस्तान सामन्यानंतर पाकिस्तानने तक्रार करत अशी मागणी केली होती की, आशिया कपच्या मॅच रेफरी पॅनेलमधून मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना काढून टाकाव, जर ते पुढच्या सामन्यात असतील तर पाकिस्तान संघ पुढचा सामना खेळणार नाही.
मात्र आयसीसीने त्यांच्या तक्रारीला फेटाळून लावले, ज्यामुळे पीसीबीने आपल्या संघाला त्यांच्या हॉटेलमध्ये परतण्याचे आदेश दिल्याचे. तसेच पाकिस्तानी संघ दुबई स्टेडियमसाठी रवानाही झाला नाही. अशी माहिती समोर आली आहे. याचपार्श्वभूमिवर आशियाई क्रिकेट परिषदेने एका पाऊल उचलत पाकिस्तान आणि युएई यांच्यातील सामन्याची ट्वीटर पोस्ट डिलिट केली आहे. त्यामुळे वातावरण गंभीर झालं आहे.
पाकिस्तानने दिलेल्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या धमकीवर काय उत्तर येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तसेच पाकिस्तानने हा सामना खेळला नाही तर युएईला सुपर 4 चं तिकीट मिळणार आहे. पाकिस्तान आणि युएई यांच्यातील सामना रात्री 8 वाजता सुरु होणार असून, यासाठी यूएई संघ स्टेडियमला रवाना झाला आहे. मात्र पाकिस्तानी संघाने शेवटच्या क्षणी सामन्यातून माघार घेतली असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे पुढे काय होतं याची उत्सुकता वाढली आहे.
आशिया कप 2025 मधील दुबईत खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाच्या कर्णधाराने आणि संपुर्ण टीमने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. सामना पार पडल्यानंतर भारतीय खेळाडू ड्रेसिंगरूमकडे निघाले. तर दुसरीकडे पाकिस्तान संघातील खेळाडू हे मैदानातच हस्तांदोलन करण्यासाठी थांबले होते. यानंतर पीसीबीने पायक्रॉफ्ट यांना काढून टाकण्याची मागणी केली.