Prithvi Shaw : करिअरला उतरती कळा, तरीही पृथ्वी शॉचा मोठा निर्णय; मुंबई सोडताच मिळाल्या अनेक ऑफर

Prithvi Shaw : करिअरला उतरती कळा, तरीही पृथ्वी शॉचा मोठा निर्णय; मुंबई सोडताच मिळाल्या अनेक ऑफर

पृथ्वी शॉने स्वतःच्या क्रिकेट कारकिर्दीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पृथ्वी शॉने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे (MCA) दुसऱ्या राज्यातून क्रिकेट खेळण्यासाठी 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) मागितले आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ सध्या अपयशाच्या छायेखाली असून त्याच्या कारकिर्दीत अनेक आव्हानं उभी राहिली आहेत. भारतीय संघाबरोबरच मुंबईच्या रणजी संघातूनही त्याला वगळण्यात आलं आहे. यंदाच्या IPL हंगामातही त्याला फारशी संधी मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर, शॉने स्वतःच्या क्रिकेट कारकिर्दीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे (MCA) दुसऱ्या राज्यातून क्रिकेट खेळण्यासाठी 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) मागितले आहे. म्हणजेच, तो आता मुंबईऐवजी इतर कोणत्यातरी राज्याच्या संघात सहभागी होण्याचा विचार करत आहे. मुंबई संघात स्थान मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा असून, सध्या काही नवोदित खेळाडूंनी आपलं स्थान मजबूत केल्याने शॉसाठी संधी कमी झाल्या आहेत.

MCA च्या एका सूत्रानेही हे वृत्त मान्य केलं असून, लवकरच NOC वर निर्णय घेतला जाणार आहे. शॉच्या तंदुरुस्तीवर गेल्या काही काळात सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्याला वजन कमी करण्यास आणि फिटनेस सुधारण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानंतर त्याने स्वतःच्या फिटनेसवर काम केल्याचंही दिसून आलं आहे.

मुंबई T20 लीगमध्ये शॉने अलीकडे सहभाग घेतला होता, जिथे त्याने कर्णधार म्हणून चमकदार खेळी केली. मात्र संघात सध्या आयुष म्हात्रे, यशस्वी जैस्वाल आणि अंगकृष रघुवंशी यांसारखे पर्याय उपलब्ध असल्याने शॉच्या स्थानाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. शॉला 2 ते 3 राज्य संघांकडून खेळण्याच्या ऑफर्स मिळाल्याचं बोललं जातं आहे आणि यामुळेच त्याने नवा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या करिअरला पुन्हा गती देण्यासाठी पृथ्वी शॉ आता नव्या संघातून क्रिकेट खेळण्यास सज्ज होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com