Smriti Mandhana : स्मृती मानधना शतक झळकावत विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडला
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. दमदार फलंदाजी करताना तिने केवळ शतक झळकावले नाही, तर विराट कोहलीचा विक्रम मोडत इतिहासाचे नवे पान लिहले आहे.
ऑस्ट्रेलियाने आधी फलंदाजी करत तब्बल 412 धावा केल्या होत्या. इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग कठीण असल्याचे भासले. मात्र, स्मृती मानधना मैदानात उतरली आणि सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चकित केले. तिने अवघ्या 23 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतकाचा मान पटकावला.
यानंतर तिचा धडाका सुरूच राहिला. सतत फटकेबाजी करताना स्मृतीने फक्त 50 चेंडूत शतक पूर्ण केले. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहलीने 52 चेंडूत शतक ठोकले होते. स्मृतीने दोन चेंडू कमी खेळत शतक झळकावले आणि हा विक्रम आपल्या नावे केला.
शतकानंतरही ती आक्रमकच राहिली आणि 125 धावांची झंझावाती खेळी साकारली. ती बाद झाल्यावर भारताचा डाव कोसळला असला तरी, तिच्या या इनिंगने महिला क्रिकेटच्या इतिहासात नवा टप्पा गाठला आणि विराट कोहलीच्याही विक्रमावर शिक्कामोर्तब केले.