Eng vs Ind 2nd Test : टीम इंडियाला मोठा धक्का! इंग्लंड दौऱ्याच्या मधेच स्टार खेळाडूला अचानक परतावे लागले मायदेशी
भारताला लीड्स कसोटीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर लगेच आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा याला इंग्लंड दौऱ्यावरून भारतात परत पाठवण्यात आलं आहे. पहिल्या कसोटीत भारताने तब्बल पाच शतके झळकावूनही सामना गमावला, ज्यामुळे संघावर टीका झाली होती. त्याच दरम्यान हर्षितच्या परतीची बातमी क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.
बीसीसीआयने जाहीर केलेल्या मूळ कसोटी संघात हर्षित राणाचे नाव नव्हते. मात्र, लीड्स कसोटीदरम्यान तो संघासोबत उपस्थित होता. प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी या निर्णयाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. टाईम्स ऑफ इंडिया शी बोलताना ते म्हणाले, "संघातील काही खेळाडूंच्या फिटनेसबाबत चिंतेमुळे आम्ही हर्षितला बॅकअप म्हणून बोलावलं होतं. पण सध्या सर्व खेळाडू तंदुरुस्त असल्याने त्याला परत पाठवण्याचा निर्णय घेतला."
लीड्स कसोटीत भारताने पहिल्या डावात व दुसऱ्या डावात प्रत्येकी शतक ठोकणाऱ्या ऋषभ पंतसह गिल, यशस्वी आणि केएल राहुल यांच्या शतकांमुळे मजबूत धावसंख्या उभारली होती. तरीही इंग्लंडने अंतिम डावात 371 धावांचा पाठलाग करत सामना जिंकला. कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ होती की एखाद्या संघाने 5 शतके झळकावूनही पराभव पत्करावा लागला.
हर्षित राणाची कसोटी कारकीर्द
आतापर्यंत हर्षित राणाने केवळ दोन कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने चार बळी घेतले आहेत. तो आगामी काही सामने गमावणार असला, तरी भविष्यात पुन्हा संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.