Womens T20 World Cup 2025 : टी-20 विश्वचषकाला आजपासून सुरुवात! पहिल्या सामन्याचा मान भारताला; पण पाकिस्तानचे सामने...
महिला टी-20 विश्वचषकाचा 13 वा हंगाम आजपासून (30 सप्टेंबर) गुवाहाटी येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने सुरू होत आहे. दुपारी 3 वाजता होणाऱ्या या उद्घाटन सामन्याने स्पर्धेला प्रारंभ होणार असून, भारत या वेळचा यजमान आहे. मात्र, पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळवले जातील.
स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होत असून, 2 नोव्हेंबरपर्यंत 31 सामने खेळले जाणार आहेत. 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी उपांत्य सामने होतील, तर अंतिम सामना नवी मुंबईतील DY पाटील स्टेडियमवर पार पडणार आहे. जर पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचला, तर तो सामना कोलंबो येथे खेळवला जाईल. सर्व सामने दुपारी 3 वाजता सुरू होतील, फक्त 26 ऑक्टोबर रोजी इंग्लंड-न्यूझीलंडचा सामना सकाळी 11 वाजता सुरू होईल.
भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ थेट पात्र झाले आहेत. पात्रता फेरीतून पाकिस्तान आणि बांगलादेशाने प्रवेश मिळवला. विशेष म्हणजे, 2000 नंतर प्रथमच वेस्ट इंडिज महिला संघ पात्र ठरू शकला नाही.
स्पर्धा राउंड-रॉबिन स्वरूपात होईल, ज्यात प्रत्येक संघ 7 सामने खेळेल. अव्वल 4 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील आणि नंतर विजेते संघ अंतिम फेरीत भिडतील. सामने गुवाहाटी, इंदूर, विशाखापट्टणम आणि नवी मुंबई येथे होतील. पाकिस्तानच्या सामन्यांसाठी कोलंबो राखीव ठेवण्यात आले आहे.
या वेळेस पावसाचा अडथळा संभवतो, कारण ईशान्य मान्सून आगमन झाल्याने काही सामने प्रभावित होऊ शकतात. स्पर्धेच्या बक्षीस रकमेत मोठी वाढ झाली असून एकूण 122 कोटी रुपयांचे वितरण होणार आहे. विजेत्याला 39.5 कोटी, उपविजेत्याला सुमारे 20 कोटी, तर उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी 10 कोटी मिळतील. गट स्तरातील प्रत्येक विजयासाठी स्वतंत्र पारितोषिकाची तरतूद आहे.