Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची शानदार कामगिरी! अन् कॅप्टन गिलला देखील मागे टाकलं
इंग्लंड दौऱ्यात भारताच्या अंडर-19 संघाने 5 सामन्यांची वनडे मालिका 3-2 ने जिंकली असून, या मालिकेत वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीची सर्वत्र चर्चा आहे. भारत-अंडर 19 संघाने इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका जिंकताना वैभव सूर्यवंशीने जबरदस्त कामगिरी करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने मालिकेतील पाच सामन्यांत 71 ची सरासरी राखत 174.01 च्या स्ट्राईक रेटने एकूण 355 धावा केल्या.
या धावांसह सूर्यवंशीने अंडर-19 वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम शुबमन गिलच्या नावावर होता, ज्याने 2017 मध्ये 351 धावा केल्या होत्या. त्यापूर्वी 2002 मध्ये अंबाती रायुडूने 291 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे, वैभवने एका सामन्यात केवळ 52 चेंडूत शतक झळकावत यूथ वनडे क्रिकेटमधील सर्वात जलद शतक ठोकले. त्याच मालिकेत त्याने 20 चेंडूत अर्धशतकही साकारले, जे यूथ वनडे क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक ठरले.
आयपीएलमध्येही वैभवने आपली चमक दाखवली आहे. त्याने सात सामन्यांत 206.55 च्या स्ट्राईक रेटने 255 धावा केल्या असून यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. आता सर्वांचे लक्ष 12 जुलैपासून सुरू होणाऱ्या दोन युथ कसोटी सामन्यांकडे लागले आहे, ज्यात वैभव सूर्यवंशीची कामगिरी पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.