”इंग्लंड 9 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची पुनरावृत्ती करेल”
लोकशाही न्यूज नेटवर्क | ऑस्ट्रेलिया विरोधातील अजिंक्य विजयानंतर भारत आता इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. या मालिकेपूर्वीच इंग्लंडचे माजी मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी भारताला डिवचलं आहे.इंग्लंड भारतीय भूमीवरचा 9 वर्षांपूर्वी तो विक्रम पुन्हा करेल, असा विश्वास फ्लॉवर यांनी व्यक्त केला आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ भारतात पोहोचला आहे. भारतातल्या आगमनाचा व्हिडिओ इंग्लंड टीमच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये संघाचे सर्व खेळाडू चेन्नईतील हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. दरम्यान या दोन्ही संघांनी कसोटी मालिकेत शानदार विजय मिळवला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधात तर इंग्लंडने श्रीलंकेविरोधात कसोटी मालिकेत शानदार विजयाची नोंद केली आहे. यामुळे इंग्लंड आणि टीम इंडियाचा विश्वास दुणावला आहे.
9 वर्षांपूर्वीचा विक्रम
भारतीय भूमीवरचं इंग्लंडने भारतालाच 2012 साली पराभवाची धूळ चाखायला लावली होती. इंग्लंडच्या या ऐतिहासिक कामगिरीपाठीमागे पूर्व प्रशिक्षक म्हणून अँडी फ्लॉवर यांचा महत्त्वाचा वाटा होता.इंग्लंडच्या 2012 च्या विजयामध्ये ग्रॅमी स्वान आणि माँटी पनेसर या दोन्ही फिरकी गोलंदाजांनी आणि स्टार फलंदाज केविन पीटरसन याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गेल्या दहा दशकातील भारतीय भूमीवरील परदेशी संघातल्या मालिकेतला हा एकमेव विजय आहे.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
- पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी
- दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी
- तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी
- चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च