Gautam Gambhir : गौतम गंभीर आणि 'द ओव्हल' मैदानाचे मुख्य क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात जोरदार राडा; VIDEO व्हायरल
(Gautam Gambhir)भारत आणि इंग्लंड यांच्यातील बहुप्रतीक्षित कसोटी मालिकेमधील अखेरचा सामन्याच्या निमित्ताने दोन्ही संघ मैदानात जोरदार सराव आहेत. पाच सामन्यांच्या या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना 31 जुलैपासून ‘द ओव्हल’ मैदानावर खेळवला जात आहे. या मालिकेकडे केवळ क्रिकेटप्रेमीच नव्हे, तर संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून आहे, कारण दोन्ही संघ विजेतेपदासाठी आपले सर्वस्व पणाला लावत आहेत. मात्र या सामन्यापूर्वी एक वेगळीच घटना समोर येत आहे.
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या पाचव्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि ‘द ओव्हल’ मैदानाचे प्रमुख ग्राऊंड्समन ली फोर्टिस यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे. ही घटना 29 जुलै रोजी सराव सत्रादरम्यान घडली. त्यावेळी भारतीय संघ सराव करत असताना ग्राऊंड्समन ली फोर्टिस यांनी काही सूचना दिल्या. या सूचनांमध्ये "विकेटपासून 2.5 मीटर अंतरावर उभे राहा आणि दोरीबाहेरून निरीक्षण करा" असे सांगण्यात आले. मात्र, गंभीर यांना या सूचनेची पद्धत आणि बोलण्याची शैली रुचली नाही.
फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांनी आपल्या कारकिर्दीत अशी सूचना यापूर्वी कधीच ऐकली नव्हती. फोर्टिस यांच्या अशा वर्तनामुळे गंभीर संतापले.घटनेदरम्यानचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुमारे दोन मिनिटे चाललेल्या या वादामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं होतं. हा प्रकार पाचव्या कसोटी सामन्याआधी चर्चेचा विषय ठरतो आहे.