Jasprit Bumrah: हार्दिकच्या घरवापसीने मुंबई पलटनमध्ये नाराजी? बुमराहचा रोख कुणाकडे?

Jasprit Bumrah: हार्दिकच्या घरवापसीने मुंबई पलटनमध्ये नाराजी? बुमराहचा रोख कुणाकडे?

यंदाच्या वर्षीच्या आयपीएल हंगामासाठीच्या संघांमध्ये प्लेअर ट्रेडिंगची प्रक्रिया आता पूर्ण झालीय आहे. यावेळी सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला खेळाडू हार्दिक पंड्या अखेर मुंबई इंडियन्सच्या संघात परत आला आहे.
Published by :
Team Lokshahi

प्रणव ढमाले| मुंबई : यंदाच्या वर्षीच्या आयपीएल हंगामासाठीच्या संघांमध्ये प्लेअर ट्रेडिंगची प्रक्रिया आता पूर्ण झालीय आहे. यावेळी सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला खेळाडू हार्दिक पंड्या अखेर मुंबई इंडियन्सच्या संघात परत आला आहे. हार्दिक गेले 2 वर्ष गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार होता. 2020 साली झालेल्या मेगा ऑक्शन वेळी मुंबईच्या संघानं हार्दिकला रिलीज केलं होतं. त्यावेळी गुजरातनं हार्दिकला संघात सामील करून घेतलं आणि त्याच्यावर नेतृत्वाची धूरा सोपावली. हार्दिकनंही पहिल्याच हंगामात गुजरातला जेतेपद मिळवून दिलं आणि सलग दुसऱ्या हंगामात अंतिम सामन्यात पोहोचण्याचा विक्रमही रचला. मात्र, यंदाच्या हंगामात हार्दिकला मुंबईच्या संघानं प्लेअर ट्रेडिंग विंडोच्या सहाय्यानं पुन्हा आपल्या संघात सामील करून घेतलं. मात्र, आता हार्दिक पंड्याच्या घरवापसीमुळे मुंबई इंडियन्सच्या संघातच नाराजी असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. याचं मूळ कारण ठरल्या आहेत त्या जसप्रीत बुमराहनं पोस्ट केलेल्या 2 इन्स्टाग्राम स्टोरीज.

मुळात येत्या 2 ते 3 वर्षात मुंबईचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा क्रिकेट मधून निवृत्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यामागील मूल कारण हे रोहित शर्माचं वय आहे. त्यामुळंच भविष्यात रोहितच्या नेतृत्वासला पर्याय म्हणून मुंबईच्या संघानं हार्दिकला संघात घेतल्याच्या बातम्या समोर आल्या. मात्र, त्यानंतर मुंबईच्या संघातील अंतर्गत वादानं तोंड वर काढलं. विशेष म्हणजे सोमवारी हार्दिकची घरवापसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी मुंबईचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहनं एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली. त्यात बुमराहनं "SOMETIMES BEING GREEDY IS GOOD AND BEING LOYAL ISN'T"

अर्थात कधी कधी लोभी असणं चांगलं असतं आणि प्रामाणिक असणं नसतं का? अशा आशयाची स्टोरी शेअर करत बुमराहनं अप्रत्यक्षपणे हार्दिकच्या घरवापसीवर भाष्य केलं. त्यानंतर काही वेळातंच बुमराहची ही स्टोरी व्हायरल झाली आणि बुमराहनं ही स्टोरी डिलीट करत आणखी एक स्टोरी शेअर केली. ज्यात लिहीलं होतं "SOMETIME SILENCE IS THE BEST ANSWER"

दरम्यान, यासर्व घटनाक्रमात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटला अनफॉलो केल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे जेव्हा हार्दिकच्या ट्रेडची चर्चा सुरू होती त्यावेळी मुंबईनं हार्दिकला संघात न घेता कॅमरॉन ग्रीनला संघात ठेवावं अशी शिफारस खुद्द रोहितनं टीम मॅनेजमेंटकडे केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, रोहितच्या मागणीनंतरही मुंबईनं कॅमरॉन ग्रीनला सोडत हार्दिकला संघात सामील करून घेतलं. त्यामुळंच रोहित शर्माही नाराज असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. आता या सगळ्या घटनाक्रमामागे नक्की मुंबईच्या संघातील नाराजी आहे की दुसरं काही हे येत्या काळात समोर येईलच. मात्र, नाराजी असली तरीही ती खेळाच्या मैदानात संघाच्या संतुलनावर प्रभाव पाडणार नाही अशी आशा आता क्रिकेट आणि खासकरून मुंबई इंडियन्सचे चाहते व्यक्त करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com