नीरज चोप्राने रचला इतिहास; डायमंड लीग जिंकणारा ठरला पहिला भारतीय

नीरज चोप्राने रचला इतिहास; डायमंड लीग जिंकणारा ठरला पहिला भारतीय

24 वर्षीय नीरज चोप्रा डायमंड लीग फायनल जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे.

नवी दिल्ली : भालाफेकपटू नीरज चोप्राने इतिहास रचला आहे. 24 वर्षीय नीरज चोप्रा डायमंड लीग फायनल जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. झुरिचमध्ये झालेल्या फायनलमध्ये नीरज चोप्राने 88.44 मीटरच्या थ्रोसह विजेतेपद पटकावले. नीरजने झेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेच आणि जर्मनीच्या ज्युलियन वेबरचा पराभव केला.

झुरिच येथे झालेल्या डायमंड लीग फायनलमध्ये नीरजची सुरुवात खराब झाली होती. आणि त्याचा पहिला थ्रो फाऊल झाला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 88.44 मीटर अंतरावर भालाफेक करत प्रतिस्पर्धी खेळाडूंवर आघाडी घेतली. नीरजने तिसऱ्या प्रयत्नात 88.00 मीटर, चौथ्या प्रयत्नात 86.11 मीटर, पाचव्या प्रयत्नात 87.00 मीटर आणि सहाव्या प्रयत्नात 83.60 मीटर भाला फेकला. तर, डायमंड लीग फायनलमध्ये, चेक प्रजासत्ताकचा जेकब वडलेच 86.94 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह दुसरा आणि जर्मनीचा ज्युलियन वेबर (83.73) तिसरा आला.

तर, नीरजने यापूर्वी २०१७ आणि २०१८ मध्येही डायमंड लीगमध्ये अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली होती. त्यावेळी अनुक्रमे सातव्या आणि चौथ्या स्थानावर होता. मात्र, यावेळी नीरजने डायमंड ट्रॉफी जिंकून आणखी एक यश संपादन केले.

दरम्यान, नीरजने या वर्षी जुलैमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 88.13 मीटर फेक करून ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले होते. त्या सामन्यादरम्यान नीरजच्या मांडीला दुखापत झाली होती. यामुळे त्याला बर्मिंघम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. नीरजने 2021 मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण, 2018 मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्ण, 2018 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, 2022 मध्ये जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com