IND vs AUS 4th T20: भारताचा ऑस्ट्रेलियावर 20 धावांनी विजय; 3-1 ने जिंकली मालिका

IND vs AUS 4th T20: भारताचा ऑस्ट्रेलियावर 20 धावांनी विजय; 3-1 ने जिंकली मालिका

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची मालिका भारताने 3-1 खिशात घातली आहे. टीम इंडियाने भारतात सलग 14 T-20 मालिकेत विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे.
Published by :
Team Lokshahi

IND vs AUS T-20: टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची मालिका भारताने 3-1 खिशात घातली आहे. सुरुवातीचे दोन सामने जिंकत भारताने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली होती. पण तिसऱ्या सामन्यात मॅक्सवेलच्या झंझावातामुळे ऑस्ट्रेलियाने कमबॅक केलं होतं. पण चौथ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 20 धावांनी विजय मिळवला आहे. यासह टीम इंडियाने भारतात सलग 14 T-20 मालिकेत विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पहिल्यांदाच कांगारुंना मालिकेत पराभूत केलं आहे.

रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने 174 धावा केल्या. प्रत्युत्तरात कांगारूंचा संघ 154 धावांवर गारद झाला आणि सामन्यासह मालिकाही गमावली. भारताने ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने मालिकाही जिंकली आहे. टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 3 डिसेंबरला बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल.

भारताकडून रिंकू सिंगने सर्वाधिक 46 धावा केल्या. यशस्वी जैस्वालने 37 आणि जितेश शर्माने 35 धावांचे योगदान दिले. रुतुराज गायकवाड 32 धावा करून बाद झाला. या सामन्यात टीम इंडियाला शेवटच्या दोन षटकात केवळ 13 धावा करता आल्या आणि पाच विकेट गमावल्या. त्यामुळे भारताची धावसंख्या 200 धावांच्या जवळपास पोहोचू शकली नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com