IND vs SA 5th T20: पाचवा टी-20 सामना धुक्यामुळे रद्द होणार का? अहमदाबादच्या हवामानाबाबत दिलासादायक अंदाज
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-20 सामना धुक्यामुळे रद्द झाल्यानंतर पाचव्या सामन्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. लखनौच्या एकाना स्टेडियमवर बुधवारी 17 डिसेंबर रोजी होणारा चौथा सामना दाट धुक्यामुळे टॉसविनाच रद्द करण्यात आला
धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाल्याने पंचांनी सहा वेळा मैदानाची पाहणी केली. मात्र खेळासाठी परिस्थिती अनुकूल नसल्याने अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी पसरली असून बीसीसीआयवर टीका करण्यात आली. दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा व अंतिम टी-20 सामना 19 डिसेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी अहमदाबादमधील हवामान अनुकूल राहण्याचा अंदाज आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, 19 डिसेंबर रोजी अहमदाबादमध्ये आकाश स्वच्छ राहील. तापमान 15 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच हवा गुणवत्ता निर्देशांक 100 ते 120 दरम्यान राहील. त्यामुळे सामना पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाची कामगिरी चांगली राहिली आहे. भारताने या मैदानावर आतापर्यंत 7 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यापैकी 5 सामने जिंकले आहेत, तर 2 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.
2025 या वर्षात टीम इंडियाने आतापर्यंत 20 सामने खेळले असून त्यापैकी 15 सामन्यांत विजय मिळवला आहे. 3 सामन्यांत पराभव झाला असून 2 सामने रद्द झाले आहेत. पाचव्या आणि अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढत रंगणार असून हवामान अनुकूल राहिल्यास सामना निकालास लागण्याची शक्यता आहे.
पाचवा आणि अंतिम टी-20 सामना १९ डिसेंबर रोजी अहमदाबादमध्ये
हवामान अंदाज स्वच्छ, सामना होण्याची शक्यता जास्त
नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताची कामगिरी उत्कृष्ट
2025 मध्ये टीम इंडियाने आतापर्यंत १५/२० सामन्यात विजय मिळवला
