India Vs South Africa
India Vs South Africa

IND vs SA, T20 World Cup 2024: फायनल सामन्यात नाणेफेकीचा कौल ठरणार महत्त्वाचा; प्रथम फलंदाजी की क्षेत्ररक्षण? कोणता निर्णय राहिल योग्य?

टी-२० वर्ल्डकप २०२४ चा फायनल सामना बारबाडोसच्या मैदानात आज रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरु होणार आहे.
Published by :

India vs South Africa Toss And Pitch Report : टी-२० वर्ल्डकप २०२४ चा फायनल सामना बारबाडोसच्या मैदानात आज रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरु होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० वर्ल्डकपचा निर्णायक सामना रंगणार आहे. याआधी बारबाडोसच्या मैदानात भारताने अफगानिस्तानचा पराभव केला होता. आजच्या सामन्यात ही खेळपट्टी कोणासाठी जास्त पोषक असेल, खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणं योग्य असेल की गोलंदाजी? असा सवाल तमामा क्रिकेट प्रेमींना पडला आहे.

भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ च्या फायनल सामन्यात खेळपट्टीबाबत मोठी चूक केली होती. त्याचे परिणाम संघाला भोगावे लागले. त्यामुळे वर्ल्डकपच्या या फायनलच्या सामन्यात टीम इंडिया खेळपट्टीबाबत आता चुकीचा निर्णय घेणार नाही. सामन्याच्या एक दिवस आधी कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्माने खेळपट्टीबाबत अभ्यासही केला आहे.

खेळपट्टीमुळं फिरकीपटूंना होणार मदत

या खेळपट्टीवर भारत-अफगानिस्तानचा सामना झाला होता. परंतु, पिच रिपोर्टनुसार, आजच्या सामन्यात ही खेळपट्टी त्या स्वरुपाची नसणार आहे. या खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळू शकते. फिरकीपटूंचा चेंडू खेळपट्टीवर स्पिन होईल, तर कधी चेंडूला उसळीही मिळू शकते. जर ओवरकास्ट कंडिशन राहिली, तर सुरुवातीला वेगवान गोलंदाजांनाही मदत मिळू शकते.

भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करावी

कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यास भारतासाठी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो. कारण फायनलच्या सामन्यात स्कोअर बोर्डचा दबाव जास्त असतो. टीम इंडियाची फलंदाजी मजबूत आहे. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत १७० हून अधिक धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिका खूप दबावात येईल. तसंही भारताने या वर्ल्डकपमध्ये जास्त सामने प्रथम फलंदाजी करून खेळले आहेत. याशिवाय दक्षिण आफ्रिका फलंदाजीत कमकुवत आहे. त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत पण फलंदाजीसाठी त्यांना संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे त्यांच्यावर रन चेजचा दबाव असला, तर संघ अडचणीत सापडू शकतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com