कसोटीपाठोपाठ टी-20च्या रँकिंगमध्ये भारताची भरारी

कसोटीपाठोपाठ टी-20च्या रँकिंगमध्ये भारताची भरारी

Published by :
Published on

विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघाने कसोटीपाठोपाठ आता टी-२०च्या रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताने प्रथम स्थान आधीच काबीज केल आहे. त्यात आता आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत न्यूझीलंडकडून ३-२ ने पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या स्थानावरून भारतापेक्षा फक्त एका गुणाने मागे गेला. इंग्लंड सध्या पहिल्या क्रमांकावर असून भारतापेक्षा सात गुणांनी पुढे आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये लवकरच पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार असून यावेळी भारताला हे अंतर कमी करण्याची संधी आहे.

दरम्यान टी-२० फलंदाजांच्या रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच न्यूझीलंडविरोधात चांगली कामगिरी केल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर के एल राहुल पहिल्या स्थानावरुन तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली सहाव्या स्थानी कायम आहे.

विशेष म्हणजे टी-२० गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिंगमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये अफगाणिस्तानचा राशीद खान पहिल्या क्रमांकावर आहे, तर मोहम्मद नबी अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com