Lionel Messi In India : मेसीचा भारत दौरा पुढे ढकलला! फिफाची परवानगी न मिळाल्याने सामना रद्द नाही, नव्या तारखेची प्रतीक्षा

Lionel Messi In India : मेसीचा भारत दौरा पुढे ढकलला! फिफाची परवानगी न मिळाल्याने सामना रद्द नाही, नव्या तारखेची प्रतीक्षा

अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेसी आणि त्याचा संघ भारतात खेळविण्यात येणारा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. हा सामना 17 नोव्हेंबर रोजी कोचीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार होता.
Published by :
Prachi Nate
Published on

अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेसी आणि त्याचा संघ भारतात खेळविण्यात येणारा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. हा सामना 17 नोव्हेंबर रोजी कोचीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार होता. मात्र, फिफाची परवानगी वेळेत न मिळाल्याने अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशन (AFA) आणि आयोजकांनी हा सामना सध्या स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हा सामना रिपोर्टर ब्रॉडकास्टिंग कंपनी प्रायोजकत्वात आयोजित केला जाणार होता. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अँटो ऑगस्टीन यांनी सोशल मीडियावर या निर्णयाची माहिती देताना सांगितले, “फिफाची अधिकृत परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याने अर्जेंटिना संघाचा केरळ दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. सामना रद्द झालेला नाही. तो पुढील आंतरराष्ट्रीय ‘फिफा विंडो’मध्ये खेळवला जाईल. नव्या तारखेची घोषणा लवकरच केली जाईल.”

दरम्यान, स्पॅनिश वृत्तपत्र La Nación ने दिलेल्या माहितीनुसार, अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की भारताकडून काही तांत्रिक आणि आयोजनाशी संबंधित अटी पूर्ण करण्यात उशीर झाला. त्यामुळे सामना नोव्हेंबरमध्ये घेणे शक्य झाले नाही.

अर्जेंटिना संघाच्या भारत दौऱ्याची घोषणा केरळचे क्रीडामंत्री V. अब्दुर्रहमान यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. त्यानंतर या सामन्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अखेरीस, आयोजक आणि AFA यांच्यातील चर्चेनंतर सामना पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा सामना मार्च 2026 च्या फिफा आंतरराष्ट्रीय विंडोमध्ये आयोजित केला जाण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com