मुशीर खानची IPL खेळण्याबाबत मोठी प्रतिक्रिया, म्हणाला, "वडील सांगतात टीम इंडियात..."
मुंबईने विदर्भचा पराभव करुन ८ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीवर विजयाची मोहोर उमटवली. अशातच आता मुंबईचा स्टार खेळाडू मुशीर खानने माध्यमांशी संवाद साधताना मोठी प्रतिक्रिया दिलीय. मुशीर पीटीआयशी बोलताना म्हणाला, माझं नाव आयपीएलमध्ये नाही आहे. पण मी निराश नाही. कसोटी क्रिकेट आणि टीम इंडियासाठी खेळ. आज नाही तर उद्या आयपीएल खेळता येईल, असं माझ्या वडिलांनी मला सांगितलं आहे.
मुशीर म्हणाला, चांगलं आहे, मला आयपीएलच्या तयारीसाठी आणखी एक वर्ष मिळालं. मी आता टी-२० क्रिकेटला आणखी समजून घेईल. म्हणजे मला या फॉर्मेटसाठी कशाप्रकारे तयारी करायची आहे, हे कळेल. मुंबईच्या दुसऱ्या डावात मुशीरने १३६ धावांची शतकी खेळी केली होती. त्यामुळे विदर्भला ५३८ धावांचं लक्ष्य देता आलं. परंतु, विदर्भला हे लक्ष्य गाठता न आल्यानं मुंबईचा संघ ४२ वेळा रणजी ट्रॉफीवर विजय मिळवण्यात यशस्वी झाला.
मुशीर त्याचा मोठा भाऊ सर्फराज खानकडून प्रेरणा घेत असतो. सर्फराजने इंग्लंडविरोधात राजकोटमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियात पदार्पण केलं. मुशीर यावर बोलताना म्हणाला, मी माझ्या भावाची फलंदाजी पाहून प्रेरणा घेतो. आमच्या फलंदाजीची पद्धतही सारखीच आहे. रणजी ट्रॉफीच्या फायनला एक सामान्य सामनाच म्हणून खेळ आणि जास्त दबाव घेऊ नको, असं सर्फराजने मला सांगितलं होतं.