T20 World Cup, Namibia vs Oman
T20 World Cup, Namibia vs Oman

T20 World Cup 2024: नामीबियाने सुपर ओव्हरमध्ये केला मोठा विक्रम! वर्ल्डकपमध्ये 'हा' कारनामा करून रचला इतिहास

नामीबिया आणि ओमान यांच्यात बारबाडोसमध्ये झालेला महामुकाबला सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला आणि नामीबियाने अखेर ११ धावांनी हा सामना जिंकला.
Published by :

Namibia vs Oman Super Over : टी-२० वर्ल्डकप २०२४ चा तिसरा सामना रंगतदार झाला. नामीबिया आणि ओमान यांच्यात बारबाडोसमध्ये झालेला महामुकाबला सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला आणि नामीबियाने अखेर ११ धावांनी हा सामना जिंकला. ओमानने प्रथम फलंदाजी करून १९.४ षटकात फक्त १०९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात नामीबिया हे लक्ष्य सहजरित्या पूर्ण करेल, असं अनेकांना वाटलं. परंतु, ओमानच्या भेदक गोलंदाजीमुळं नामीबियाला फक्त १०९ धावांपर्यंतच मजल मारता आली आणि सामना टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये नामीबियाने २१ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात ओमानला १० धावाच करता आल्या.

नामीबियाचा कर्णधार गेरहार्ड एरास्मसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ओमानची सुरुवात चांगली झाली नाही. नामीबियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज रुबेन ट्रंपलमैनने पहिल्याच षटकात त्यांना दोन मोठे धक्के दिले. रुबेनने पहिल्या दोन चेंडूतच ओमानच्या दोन फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवलं. प्रजापती कश्यप आणि आकिब इलियासला भोपळालाही फोडता आला नाही. त्यानंतर जीशान मकसूनने सावध खेळी करत डाव सांभाळला. पण जीशान २२ धावांवर बाद झाला. त्यानंतर अयान खान अवघ्या १५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. नामीबियाच्या रुबेन ट्रंपलमैनने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांमध्ये २१ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्यामुळे ओमानला या सामन्यात जास्त धावा करता आल्या नाहीत.

डेविड वीसाने सुपर ओव्हरमध्ये केली चमकदार कामगिरी

सुपर ओव्हरमध्ये नामीबियाने प्रथम फलंदाजी करून २१ धावा केल्या. टी-२० वर्ल्डकपमध्ये सुपर ओव्हरमध्ये हा सर्वाधिक स्कोअर आहे. डेविडने संघासाठी सुपर ओव्हरमध्ये अप्रतिम फलंदाजी केली. त्याने एकूण १३ धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात ओमानच्या संघाला फक्त १० धावाच करता आल्यानं त्यांचा पराभव झाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com