ODI World Cup 2023: क्रिकेटच्या महाकुंभाला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात? भारत-पाक सामन्याकडे लक्ष

ODI World Cup 2023: क्रिकेटच्या महाकुंभाला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात? भारत-पाक सामन्याकडे लक्ष

12 वर्षांनंतर भारताला यजमानपदाचा बहुमान
Published on

नवी दिल्ली : क्रिकेटच्या महाकुंभ म्हणजेच क्रिकेट वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. 12 वर्षांनंतर ICC क्रिकेट वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारताला मिळालाय. या वर्ल्ड कप स्पर्धेला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. आता वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक हे 27 जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयसीसीने दिलीये. यामध्ये भारत-पाक सामन्याकडे क्रिकेटप्रेमीचं विशेष लक्ष राहणार आहे.

यंदा विश्वचषकात एकूण 10 संघांमध्ये 48 सामने होणार आहेत. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या मेगा स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरले आहेत. उर्वरित दोन संघ या महिन्यात झिम्बाब्वे येथे सुरू होणाऱ्या पात्रता स्पर्धेद्वारे निश्चित केले जातील. पात्रता स्पर्धांमध्ये वेस्ट इंडिज, श्रीलंका, नेदरलँड, आयर्लंड, नेपाळ, ओमान, स्कॉटलंड, संयुक्त अरब अमिराती आणि यजमान झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.

2019 विश्वचषकाप्रमाणे, यावेळीही सामने राऊंड-रॉबिन स्वरूपात खेळवले जातील. यात प्रत्येक संघ दुसर्‍याविरुद्ध एकदा खेळेल. म्हणजेच ग्रुप स्टेज संपल्यानंतर सर्व संघ 9-9 सामने खेळले असतील. गटातील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत आमने-सामने येतील. उपांत्य फेरीचे सामने 15 आणि 16 नोव्हेंबरला खेळवले जाण्याची शक्यता आहे. आणि अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.

दरम्यान, पाकिस्तानला आपला सामना टीम इंडियाविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळणार आहे. अशा परिस्थितीत पीसीबीने सुरक्षेचे कारण देत हे ठिकाण बदलण्याची मागणी केली होती, पण आयसीसी आणि बीसीसीआयने ही मागणी मान्य केली नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com