चेस वर्ल्ड कपमध्ये भारताच्या प्रज्ञानंदचा मॅग्नस कार्लसनकडून पराभव
नवी दिल्ली : फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय बुद्धिबळाचा ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानंदने दमदार कामगिरी केली. परंतु, त्याला जगातील नंबर वन खेळाडू मॅग्नस कार्लसनच्या हातून पराभव स्वीकारावा लागला. अंतिम फेरीत दोन दिवसांत दोन सामने खेळले गेले आणि दोन्ही सामने अनिर्णित राहिले. यानंतर टायब्रेकरमधून निकाल लागला.
18 वर्षीय प्रज्ञानंदने दोन्ही गेममध्ये 32 वर्षीय कार्लसनला कडवी झुंज दिली. दोघांमधील पहिला सामना 34 चालींसाठी गेला, पण निकाल लागला नाही. दुसऱ्या गेममध्ये दोघांमध्ये 30 चाली झाल्या. दोन्ही सामने अनिर्णित राहिल्यानंतर गुरुवारी (24 ऑगस्ट) टायब्रेकरमधून निकाल लागला. कार्लसनने प्रथम हे विजेतेपद पटकावले आहे. आता विश्वचषक विजेतेपद पटकावल्यावर त्याला बक्षीस म्हणून एक लाख 10 हजार अमेरिकन डॉलर्स मिळतील. तर, प्रज्ञानंदला रौप्य पदकावर समाधान मानावे लागणार आहे.
दरम्यान, प्रज्ञानंदने उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या फॅबियानो कारुआनाचा ३.५-२.५ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारा प्रज्ञानंद हा दिग्गज विश्वनाथन आनंद यांच्यानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे. प्रज्ञानंदने उपांत्य फेरीतही ऐतिहासिक विजय मिळवला होता.