Punjab Kings vs Delhi Capitals
Punjab Kings vs Delhi Capitals

IPL 2024 : लिविंगस्टनने गगनचुंबी षटकार ठोकला अन् पंजाब जिंकला, दिल्ली कॅपिटल्सचा निसटता पराभव

दिल्लीच्या सुमित कुमारच्या गोलंदाजीवर अखेरच्या षटकात लियाम लिविंगस्टनने षटकार ठोकून पंजाबला विजय मिळवून दिला.
Published by :

आयपीएलच्या १७ व्या हंगामाला सुरुवात झाली असून आज पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुसरा सामना रंगला. चंदीगडच्या महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात आला. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करून २० षटकांत ९ विकेट्स गमावून १७४ धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जने १९.२ षटकात ६ विकेट्स गमावून १७७ धावा करत विजयी सलामी दिली. दिल्लीच्या सुमित कुमारच्या गोलंदाजीवर अखेरच्या षटकात लियाम लिविंगस्टनने षटकार ठोकून पंजाबला विजय मिळवून दिला. लियामने २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २१ चेेंडूत नाबाद ३८ धावा केल्या.

पंजाबचा हुकमी अष्टपैलू खेळाडू सॅम करनने ४७ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं ६३ धावांची अर्धशतकी खेळी केली. कर्णधार शिखर धवनने १६ चेंडूत २२ धावा केल्या. परंतु, इशांत शर्माच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला. प्रभसिमरन सिंगने पंजाबसाठी सावध खेळी करत २६ धावा केल्या. पण कुलदीपच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.

त्यानंतर लियाम लिविंगस्टनलाच धावांचा सूर गवसला. दिल्ली कॅपिटल्ससाठी सलामीला मैदानात उतरलेल्या डेव्हिड वॉर्नर आणि आणि मिचेल मार्शने धमाकेदार सुरुवात केली होती. परंतु, हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर वॉर्नर (२९) धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर अर्शदीप सिंगने २० धावांवर असताना मिचेल मार्शला झेलबाद केलं. दिल्लीची सलामीची जोडी पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर शाय होपने संघाच्या आशा पल्लवीत केल्या. त्याने २५ चेंडूत ३३ धावांची खेळी केली.

परंतु, रबाडाच्या गोलंदाजीवर हरप्रीत ब्राररने शायचा झेल टीपला अन् दिल्लीच्या धावांचा वेग मंदावला. त्यानंतर कर्णधार रिषभ पंत मैदानावर उतरला. पंतने दोन चौकारांच्या मदतीनं १३ चेंडूत १८ धावा केल्या.

हर्ष पटेलच्या गोलंदाजीवर पंत १८ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर अक्षर पटेल आणि अभिषेक पोरालने आक्रमक खेळी केली. अक्षरने १३ चेंडूत २१ धावा, तर अभिषेकने १० चेंडूत ३२ धावांची खेळी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com