Rohit Sharma
Rohit Sharma

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माला अपेक्षेप्रमाणे धावांचा सूर गवसला नाही आणि याचा फटका मुंबईच्या संघाला बसला
Published by :

यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माला अपेक्षेप्रमाणे धावांचा सूर गवसला नाही. याचा फटका मुंबईच्या संघाला बसला आणि प्ले ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्सला बाहेर पडावं लागलं. याच पार्श्वभूमीवर रोहितने माध्यमांशी संवाद साधताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएलमध्ये चमकदार फलंदाजी झाली नाही, याची कबुली भारताचा कर्णधार रोहित शर्मानं दिली आहे. परंतु, यापुढे सकारात्मक विचाराने चुका सुधारण्यावर रोहितने फोकस केलं आहे. रोहितने जियो सिनेमा मॅच सेंटर लाईव्हवर म्हटलंय की, एक फलंदाज म्हणून मी अपेक्षांवर खरा उतरलो नाही. परंतु, इतके वर्ष खेळल्यानंतर मला माहितीय की, खूप विचार केला तर चांगलं खेळू शकत नाही.

रोहित म्हणाला, मी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत आहे. अभ्यास करत असतो आणि चुका सुधारण्याकडे लक्ष देत असतो. आमचं हे सत्र चांगलं राहिलं नाही. यासाठी आम्हीच जबाबदार आहोत. आम्ही खूप चुका केल्या आहेत. आम्ही काही सामन्यांमध्ये जिंकू शकलो असतो, पण तिथेही आमचा पराभव झाला. पण आयपीएलमध्ये असं होत असतं. तुम्हाला कमी संधी मिळत असतात. जेव्हा संधी मिळते, ती गमावली नाही पाहिजे. टी-२० विश्वचषकासाठी ७० टक्के संघ आयपीएलच्या आधीच निश्चित केला होता. आयपीएलमध्ये कामगिरीत चढ-उतार येत असतात. आम्ही त्यावर जास्त फोकस केलं नाही. आयपीएलच्या पहिल्या सत्राआधी वर्ल्डकप टीमच्या ७० टक्के खेळाडूंना त्यांच्या भूमिकेबाबत माहित होतं.

रोहित शर्माने आयपीएल २०२४ मध्ये १४ सामन्यांमध्ये ३२.०८ च्या सरासरीनं आणि १५०.०० च्या स्ट्राईक रेटनं ४१७ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. २०१९ नंतर रोहित शर्माचा हा पहिला आयपीएल हंगाम होता, ज्यामध्ये त्याने ४०० हून अधिक धावा केल्या आहेत. रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com