नववर्षात टीम इंडियाचा पहिला विजय; सूर्यकुमारच्या झंझावाती शतकामुळे श्रीलंकेला नमवले
नवी दिल्ली : टीम इंडियाने 2023 वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेत विजय मिळवून केली आहे. राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा 91 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिका २-१ ने जिंकली आहे.
भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 228/5 अशी मोठी धावसंख्या उभारली. सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत नाबाद 112 धावांची वादळी खेळी केली. शुभमन गिलनेही 45 धावांची चांगली खेळी केली. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने दोन बळी घेतले.
229 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 16.4 षटकांत सर्वबाद 137 धावांवर आटोपला. भारताकडून अर्शदीप सिंगने तीन बळी घेतले. तर युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्या आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. श्रीलंकेचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. कुसल मेंडिस आणि दासुन शनाका यांनी 23-23 धावा केल्या.
सामन्याचा हिरो सूर्यकुमार यादव ठरला आहे. सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत 7 चौकार आणि 9 षटकारांसह 112 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवने कारकिर्दीतील तिसरे टी-२० शतक झळकावले. टीम इंडियाने 10.4 षटकांत 100 धावा पूर्ण केल्या होत्या.