IND VS IRE: टीम इंडियाचा विजय! आयर्लंडचा 8 गडी राखून केला पराभव

IND VS IRE: टीम इंडियाचा विजय! आयर्लंडचा 8 गडी राखून केला पराभव

न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला.
Published by :
Dhanshree Shintre

T20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत भारताने विजयाने सुरुवात केली आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडचा संघ 16 षटकांत सर्वबाद 96 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 12.2 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. ऋषभ पंतने 13व्या षटकात बॅरी मॅकार्थीच्या चेंडूवर षटकार मारून सामना संपवला.

टीम इंडियाने विजयासाठी मिळालेलं 97 धावांचं आव्हान हे 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. कॅप्टन रोहित शर्मा आणि ऋषभ पंत हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले. रोहितने 52 धावांची खेळी केली. तर पंतने 26 बॉलमध्ये नॉट आऊट 36 रन्स केल्या. पंतने रिव्हर्स स्कूप मारत टीम इंडियाला विजयी केलं. तर आयर्लंडकडून बेंजामिन व्हाईट आणि मार्क एडेअर या दोघांनी 1-1 विकेट घेतली. टीम इंडियाने या विजयासह ए ग्रुपमध्ये यूएसएला पछाडत पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली.

जसप्रीत बुमराहने टी-२० विश्वचषक २०२४ ची सुरुवात मेडन ओव्हरने केली आहे. या सामन्यात त्याने डावातील सहावे षटक निर्धाव म्हणून टाकले. जसप्रीत बुमराहचे हे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ११ वे निर्धाव षटक आहे. यासह तो कसोटी खेळणाऱ्या देशाच्या गोलंदाजांमध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने भुवनेश्वर कुमारला मागे टाकले आहे. भुवनेश्वर कुमारने त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १० निर्धाव षटके टाकली होती. मात्र जसप्रीत बुमराह आता त्याच्याही पुढे गेला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com