सातारच्या कन्येचा जगात डंका! जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक; रचला 'हा' इतिहास
नवी दिल्ली : बर्लिन तिरंदाजी वर्ल्ड चॅम्पियन टूर्नामेंटमधून मोठी बातमी समोर येत आहे. आदिती गोपीचंद स्वामी हिने इतिहास रचून भारताची मान उंचावली आहे. आदितीने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षीच विश्वविजेतेपद पटकावले आहे. ही कामगिरी करणारी ती सर्वात तरुण तिरंदाज ठरली आहे. तर, आदितीने तिरंदाजी संघाची सदस्य म्हणून सुवर्णपदक जिंकले आहे. आदिती स्वामी ही मुळची महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील आहे.
सातारची कन्या आदिती गोपीचंद स्वामी हिने जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 17 वर्षीय आदितीने ऐतिहासिक कामगिरी करताना अंतिम फेरीत मेक्सिकोच्या ऑड्रिया बेसेरा हिला 149-147 ने पराभूत केले. आणि विश्व विजेतेपदावर नाव नोंदवलं आहे. आदिती ही तिरंदाजीमधील पहिली वैयक्तिक जागतिक चॅम्पियन आहे. भारताचे हे या स्पर्धेतील पहिले वैयक्तिक सुवर्णपदक आहे. आदितीच्या या सुवर्ण कामगिरीमुळे सातारचा डंका देश पातळीवर पोहोचला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ट्विट करत भारतीय टीमचे अभिनंदन केले आहे. महिला संघाने बर्लिन येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे. आमच्या चॅम्पियन्सचे अभिनंदन! त्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पण या उत्कृष्ट निकालास कारणीभूत ठरले आहे, अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.