Sugad Puja Makar Sankranti 2025: मकरसंक्रांतीला सुगड पूजा कधी आणि कशी कराल? नवरीचा ववसा म्हणजे काय?
नवीन वर्षातील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांत. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरा करण्यात येतो. मात्र महाराष्ट्रात या सणाला विशेष महत्त्व आहे. यादिवशी तिळगूळ वाटणे, पतंग उडवणे यासोबतच सुहासिनी महिला सुगडाची पूजा देखील करतात. मात्र, ही पूजा कशी केली जाते. याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
सुगड म्हणजे काय?
मकरसंक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते, हे सर्वश्रुत आहे. काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. पण त्यांना सुगड का म्हणतात? वास्तविक पाहता सुगड हा शब्द अपभ्रंश होऊन आला आहे. 'सुघट' या शब्दाचा तो अपभ्रंश होय. 'सुघट' म्हणजे सुघटीत असा घड. या घडात शेतात बहरलेले नवे धान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. लहान सुगड देवघरात मांडून त्यांची पूजा केली जाते. धनधान्याचे प्रतीक म्हणून त्यात विविध साहित्य भरले जाते.
सुगड पूजेसाठी साहित्य लिस्ट
मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलंही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्ट तयार करा. मोठे काळे सुगड, त्याहून छोटे लाल किंवा तांबड्या रंगाचे सुगड हे पाच सुगड, हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या आणि फुलं मार्केटमधून घेऊन या.
मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची?
आता ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करुन तिथे पाट किंवा चौरंग ठेवा. त्याभोवती आता सुंदर रांगोळी काढा. चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र परिधान करुन त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवा. आता पाच सुगडला पाच ठिकाणी उभं हळदी कुंकू लावा. आता हे सुगड तांदूळ किंवा गहूवर स्थापन करा. त्यानंतर सुगडमध्ये एकएक करुन हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तीळगूळ, हळद-कुंकू, गव्हाच्या ओंब्या घाला. काळ्या रंगाचं मोठं सुगड खाली त्यावर लाल रंगाचं सुगड ठेवा. सुगडावर अक्षता, फुलं, हळद, कुंकू वाहून मनोभावे पूजा करा. आता धूप, दीप अर्पण करा. सुगडाला तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवा. काही ठिकाणी हे सुगड महिला नंतर पाच जणींना वाण म्हणून देतात.
नवरीचा ववसा म्हणजे काय?
नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण अतिशय खास असतो. महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीची वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते. नवीन नवरीला काळी साडी घेतली जाते. त्याशिवाय हळदीकुंकूच्या दिवशी तिला हलव्याचे दागिनी घातले जातात. या परंपरेनुसार पाच वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजे कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणीसर वाण म्हणून देतात. तर कोकणात नवरीचा ववसा भरला जातो. पहिला ववसा हा पाच किंवा 25 चा असतो. पाचचा ववसा म्हणजे त्यात पाच विड्याची पाने, पाच सुपारी, पाच खारी, पाच वेलची, पाच लवंग, पाच हळकुंड, पाच खोबऱ्याचे तुकडे किंवा वाट्या असतात. तर 25 च्या ववसात हे साहित्य 25 असतात. पहिली मकर संक्रांत ही माहेरी असते. त्यामुळे हा ववसा तुम्ही आई, काकी, सासू, नंदन, मामी किंवा वहिनी यापैकी कोणालाही घेऊ शकतो. ववसा घेईपर्यंत महिला उपवास ठेवतात.