‘त्याला’ बलात्कार म्हणता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या जोडप्याबद्दल एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. खूप कालावधीसाठी सहमतीने शरीरसंबंध ठेवण्यात आला असेल आणि लग्न करण्याचे वचन त्याला पूर्ण करता आले नाही, तर तो बलात्कार ठरत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
एका कॉल सेंटरमध्ये काम करणारे दोघेजण लिव्ह इनमध्ये राहात होते. पाच वर्षांनंतर मुलाने अन्य एका मुलीशी लग्न केले. त्यामुळे त्याच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनमध्ये असलेल्या मुलीने थेट त्याच्यावर बलात्काराची तक्रार केली. लग्नाचे आश्वासन देऊन शरीरसंबंध ठेवल्याचा तिने आरोप केला. याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली.
एकमेकांच्या सहमतीने लिव्ह इनमध्ये ते राहात होते. त्यामुळे अशा संबंधांना बलात्कार असे म्हटले आणि त्यात पुरुषाला अटक झाली तर, यावरून एक विचित्र उदाहरण तयार होईल, असा युक्तिवाद मुलाच्या वकिलाने केला. तर, त्या मुलाने जगाला आपण पती-पत्नी असल्याचे भासवले. एका देवळात लग्न केले. नंतर मुलीला मारहाण करून तिचे पैसे घेतल्यानंतर लग्नाचे वचन तोडले, असे मुलीच्या वकिलाने सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने मुलाच्या अटकेला आठ आठवड्यांची स्थगिती दिली आहे. यादरम्यान फिर्यादी पक्षाने बलात्काराचा आरोप सिद्ध करणारे पुरावे सुनावणीच्या वेळी सादर केले होते का, हे जाणून घेण्यास सांगितले. तसेच, या खटल्यातून दोषमुक्त करण्यासाठी ट्रायल कोर्टात अर्ज सादर करू शकतात, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.