Smartphone Tips: फोनवर वारंवार पिवळी किंवा हिरवी लाईट दिसतेय? सावध व्हा, तुमची प्रायव्हसी धोक्यात
स्मार्टफोन आज केवळ संवादाचे साधन राहिलेले नाही, तर तो आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. वैयक्तिक संदेश, सोशल मीडिया चॅट्स, फोटो, व्हिडिओ, ई-मेल्स तसेच बँकिंग आणि UPIसारखी अत्यंत संवेदनशील आर्थिक माहिती आपण स्मार्टफोनमध्येच साठवतो. त्यामुळेच स्मार्टफोन हॅक होणे ही अतिशय गंभीर बाब ठरू शकते. एकदा का फोन हॅक झाला, तर तुमची सर्व खासगी माहिती चुकीच्या व्यक्तीच्या हाती जाऊ शकते.
आजच्या डिजिटल युगात हॅकर्स अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फोनमध्ये गुपचूप प्रवेश मिळवतात. अनेकदा यूजर्सना याची कल्पनाही येत नाही. मात्र, स्मार्टफोनमध्ये काही ठरावीक चिन्हे दिसू लागल्यास फोन हॅक झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातील एक महत्त्वाचे चिन्ह म्हणजे मायक्रोफोन किंवा कॅमेरा अचानक सुरू होणे.
आधुनिक स्मार्टफोनमध्ये, विशेषतः आयफोनमध्ये, मायक्रोफोन किंवा कॅमेरा सक्रिय झाल्यावर स्क्रीनच्या वरच्या बाजूला एक लहानसा नारिंगी किंवा पिवळा ठिपका दिसतो. फोन कॉल करताना किंवा ऑडिओ रेकॉर्डिंगदरम्यान हा ठिपका दिसणे स्वाभाविक आहे. मात्र, कोणताही कॉल नसताना किंवा अॅप वापरत नसताना जर हा ठिपका अचानक दिसू लागला, तर सावध होणे गरजेचे आहे. हे सूचित करू शकते की एखादे अॅप किंवा बाहेरील व्यक्ती तुमच्या फोनच्या मायक्रोफोनला गुपचूप प्रवेश करत आहे.
आजकाल हॅकिंगसाठी खास तयार केलेली अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. ही अॅप्स एकदा फोनमध्ये इन्स्टॉल झाली की, हॅकर्सना रिमोट अॅक्सेस मिळू शकतो. यामुळे ते मायक्रोफोन, कॅमेरा, संदेश, फोटो तसेच बँकिंग तपशील सहजपणे मिळवू शकतात. ही बाब बेकायदेशीर असून यूजर्सच्या गोपनीयतेवर गंभीर आघात करते.
वेगवेगळ्या स्मार्टफोन ब्रँड्समध्ये मायक्रोफोन किंवा कॅमेरा सुरू असल्याची चिन्हे वेगळी असू शकतात. त्यामुळे आपल्या फोनमधील सिक्युरिटी सेटिंग्स, अॅप परवानग्या आणि अशा सूचक चिन्हांकडे सतत लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. थोडीशी जागरूकता तुमची खासगी माहिती सुरक्षित ठेवू शकते.
