Tesla in India : टेस्लाची भारतात धडाक्यात एंट्री; मुंबईत पहिले शोरूम सुरू, 'मॉडेल Y' उपलब्ध
जगभरात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या टेस्ला (Tesla) कंपनीने अखेर भारतात अधिकृत प्रवेश केला आहे. मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील मेकर मॅक्सिटी मॉलमध्ये कंपनीचे पहिले शोरूम मंगळवारी सुरू करण्यात आले. टेस्लाच्या या प्रवेशामुळे भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. या शोरूमच्या उद्घाटनावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
टेस्ला भारतात दाखल झाल्यानंतर मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू, तसेच टाटा मोटर्स आणि महिंद्रासारख्या देशी कंपन्यांना थेट स्पर्धा निर्माण होणार आहे. या बाजारात आता टेस्लाही आपले स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने पहिल्या टप्प्यात भारतात फक्त एकच मॉडेल, म्हणजेच 'Model Y' उपलब्ध करून दिला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, शांघाय येथील टेस्ला प्लांटमधून या मॉडेलच्या सहा गाड्या आधीच मुंबईत पाठवण्यात आल्या आहेत. याशिवाय, जुलै अखेरीस दिल्लीमध्ये दुसरे शोरूम सुरू होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कंपनीने भारतातील भरती प्रक्रिया वाढवली असून, गोदामासाठीही जागा निश्चित करण्यात आली आहे.
टेस्ला Model Y हे मॉडेल दोन प्रकारांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. यात रियर-व्हील ड्राइव्ह (Rear-Wheel Drive) प्रकारामध्ये एका चार्जवर ५०० किलोमीटर इतकी रेंज मिळणार असून ही गाडी ० ते १०० किमी/तास वेगात पोहोचण्यासाठी केवळ ५.९ सेकंद घेते. दुसऱ्या प्रकारात लॉंग रेंज रियर-व्हील ड्राइव्ह (Long Range Rear-Wheel Drive) असून त्याची रेंज ६२२ किलोमीटर इतकी आहे आणि ती ० ते १०० किमी/तास या वेगात फक्त ५.६ सेकंदात पोहोचते. दोन्ही प्रकारांमध्ये ९ स्पीकर्ससह प्रीमियम साउंड सिस्टीम, १५.४ इंची फ्रंट टचस्क्रीन डिस्प्ले आणि दुसऱ्या पिढीतील सस्पेन्शन नॉइज रिडक्शन हार्डवेअरचा समावेश आहे.
टेस्लाच्या भारतातील प्रवेशाबाबत गेल्या शुक्रवारी अधिकृत संकेत देण्यात आले होते. कंपनीच्या 'Tesla India' या एक्स (पूर्वी ट्विटर) हँडलवरून “Coming soon” असा टीझर पोस्ट करण्यात आला होता. त्यात कंपनीचा भारतात प्रवेश जुलै महिन्यापासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट सूचित करण्यात आले होते. टेस्लाच्या आगमनामुळे भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात स्पर्धा अधिक तीव्र होणार असून, पर्यावरणपूरक व तांत्रिकदृष्ट्या प्रगत वाहनांच्या निवडीसाठी भारतीय ग्राहकांपुढे आणखी एक नामांकित पर्याय उपलब्ध झाला आहे.