पहिला कोकण चित्रपट महोत्सव आता सिंधुदुर्गात
कोकण (Kokan) म्हटलं की तिथलं निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारा आणि डोंगराळ भाग आठवतो. कोकणाने चित्रपटसृष्टीला उत्कृष्ट कलाकार दिले आहेत. 'सिंधुरत्न कलावंत मंच' (Sindhuratna Kalawant Manch) या संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ ते १४ मे या कालावधीत कोकण चित्रपट महोत्सवाचे (Kokan Film Festival) आयोजन करण्यात येणार आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना वाव देण्याबरोबरच येथील पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न आहे अशी घोषणा चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेते विजय पाटकर (Vijay Patkar) यांनी सावंतवाडी (Sawantwadi) येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, विजय राणे, छाया कदम, निशा परुळेकर, प्रमोद मोहिते, अमीर हडकर, प्रकाश जाधव, यश सुर्वे आदि उपस्थित होते.
या महोत्सवाच्या अंतर्गत जिल्ह्यातील आठ तालुक्यांत निवडणूक 10 मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहे. प्रथम तीन क्रमांकाच्या चित्रपटांना मानांकन दिलं जाईल आणि सन्मानित करण्यात येणार असून सर्वोत्कृष्ट कलाकार, तंत्रज्ञ यांना गौरविण्यात येणार आहे. तसेच चित्रपटसृष्टी व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या सिंधुरत्नांचा गौरव यावेळी केला जाईल. स्पर्धेसाठी २०१९ ते २०२१ या कालावधीत सेन्सॉर (Sensor) झालेल्या मराठी चित्रपटांना सहभागी होता येईल. चित्रपट निर्मीती संस्थांनी kokanchitrapatmahotsav.com या वेबसाइटवर आपले अर्ज सादर करायचे आहेत. १ एप्रिलपासून प्रवेशअर्ज करता येतील. १५ एप्रिल अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या स्पर्धेचे प्रवेश फी १०००/- (एक हजार रूपये) आकारण्यात येणार आहे. अर्ज सादर केलेल्या चित्रपट संस्थानी आपले चित्रपट mov फॉरमेट मध्ये पेनड्राइव्हवर (pendrive) आणून देणे बंधनकारक आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटन वाढण्यासाठी चालना मिळेल व त्यातून स्थानिक कलाकारांना संधी, रोजगार उपलब्ध होईल. या उद्देशाने या महोत्सव राबण्यात येत आहे.