आज २१ जून ! या वर्षातील सर्वात मोठा दिवस
पृथ्वी स्वतःभोवती २४ तासांत एक फेरी पूर्ण करते. याला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वी फिरते. ध्रुवताऱ्यावरून बघितल्यास पृथ्वी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते असे दिसेल. स्वतःभोवती फिरता फिरता वर्षभरात पृथ्वी सूर्याभोवतीची एक फेरी पूर्ण करते. याला पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात. परिवलन आणि परिभ्रमणाच्या या सतत सुरू असणाऱ्या प्रक्रियेत दरवर्षी २० ते २२ जून दरम्यानच्या एका दिवशी पृथ्वीवर सर्वाधिक काळ सूर्यप्रकाश असतो. यंदा ही परिस्थिती सोमवार २१ जून २०२१ रोजी आहे. यामुळेच यंदा २१ जून हा वर्षभरातला सर्वात मोठा दिवस आहे.
पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेगामुळे आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. प्रत्येक देशात सुर्यप्रकाश असण्याचे तास वेगवेगळे असतात. काही देशांमध्ये १२ तासांहून अधिक वेळ सुर्यप्रकाश असतो. काही देशांमध्ये आजपासून उन्हाळा सुरू होतो. तर काही देशांमध्ये उन्हाळा संपल्याचे समजले जाते. दक्षिण गोलार्धातील देशांमध्ये आज मोठी रात्र असते.
भारतात सोमवार २१ जून २०२१ रोजी १३ तास १२ मिनिटे एवढा वेळ सूर्यप्रकाश पडेल. भारतात २१ जून रोजी दिवस १३ तास आणि १२ मिनिटांचा असेल. उत्तर गोलार्धातील देशांमध्ये २१ जून २०२१ पासून उन्हाळा सुरू होईल तर दक्षिण गोलार्धात हिवाळा सुरू होईल. यामुळे उत्तर गोलार्धातील देश २१ जून २०२१ या दिवशी समर सोल्स्टिस आहे असे म्हणतील. तर दक्षिण गोलार्धातील देश २१ जून २०२१ या दिवशी विंटर सोल्स्टिस आहे असे म्हणतील.
अनेक देशांमध्ये २१ जूनचा दिवस हा ऋतुबदलाचा दिवस मानला जातो.मराठी पंचांगांमध्येही २१ जूनची नोंद 'वर्षा ऋतू प्रारंभ' अशी केलेली आहे.