Uttarkashi : उत्तरकाशीच्या धरालीत 400हून अधिक जणांना वाचवण्यात यश
(Uttarkashi ) उत्तराखंड मधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावाजवळ मंगळवारी झालेल्या महापुरात अडकलेल्या 400 हून अधिक नागरिकांना बचाव पथकांनी सुरक्षित बाहेर काढले असून, अजून सुमारे 100 जणांचा शोध सुरू आहे. हर्षिल येथील लष्करी छावणीतून बेपत्ता झालेले 1 अधिकारी आणि 8 जवान यांचाही शोध सुरू आहे. माती व दगडांच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी आधुनिक उपकरणांचा वापर करण्यात येत आहे. घटनास्थळी पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक बचाव पथक, अभियंते, वैद्यकीय कर्मचारी तसेच तज्ज्ञांसह 225 जण सहभागी असल्याची माहिती मिळत आहे. गंगोत्रीला जाणारे अनेक यात्रेकरू विविध ठिकाणी अडकले असून, त्यांच्या बचावासाठी हेलिकॉप्टर आणि इतर यंत्रणा तैनात आहेत. धराली परिसरात 50 ते 60 फूट उंच माती-दगडांचे ढिगारे तयार झाले असून त्याच्या खाली लोक अडकले असल्याचा अंदाज आहे.