किल्ले रायगडावर आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा, हजारो शिवभक्तांनी फुलला रायगड

किल्‍ले रायगडावर आज 351 वा शिवराज्‍याभिषेक दिन सोहळा साजरा, रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
Published by :
Team Lokshahi

सायली सोलकर, वैराग, प्रतिनिधी| किल्‍ले रायगडावर आज 351 वा शिवराज्‍याभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे. रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. पालखी सोहळयाने कार्यक्रमांची सांगता होणार आहे, त्याचसोबत शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके आणि शाहिरी पोवाडयांनी रात्र जागवली जाणार आहे. श्रीशिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे वाजतगाजत राजदरबारात आगमन होणार आहे. तेथे राज्‍याभिषेकाच्‍या मुख्‍य सोहळयास सुरूवात होईल.

युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्‍याहस्‍ते मंत्रोच्‍चारात शिवपुतळयाला अभिषेक, सुवर्ण नाण्‍यांचा अभिषेक करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीराजे शिवभक्‍तांना संबोधन करतील. त्‍यांनतर शिवपालखीचे शिवसमाधीकडे प्रस्‍थान करण्यात येणार आहे. शिवसमाधीला अभिवादन करून सोहळयाची सांगता होईल. हा सोहळा अनुभवण्‍यासाठी आलेल्‍या हजारो शिव भक्‍तांनी किल्‍ले रायगड फुलून गेला आहे. भगवे झेंडे, ढोलताशा यामुळे वातावरण शिवमय झाले आहे. अखिल भारतीय शिवराज्‍याभिषेक महोत्‍सव समितीने या सोहळयाचे आयोजन केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com