भिडेंच्या वक्तव्याची आता महिला आयोगाकडून दखल; चाकणकरांचे फडणवीसांना पत्र
मुंबई : संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. भिडे यांच्या वक्तव्याविरोधात राज्यभरातून संतापाची लाट दिसून येत आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांकडून अनेक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटत आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलनं केली आहे. त्यांना अटक करावी, अशी मागणी देखील विरोधी पक्षाकडून केली जात आहे. संभाजी भिडेंच्या वक्तव्याची आता राज्य महिला आयोगानं दखल घेतली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी, 'राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचा अपमान महाराष्ट्र सरकार सहन करणार नाही, हे शासनाने कृतीतून दाखवून दिले पाहिजे. राज्याचे गृहमंत्री यांनी तातडीने कारवाई करावी' अशी मागणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ त्यांनी ट्वीटरवरून शेअर केला आहे.