Arvind Sawant : आमदार अपात्रतेवर बोलत ठाकरेंच्या खासदाराचे मोठे विधान

निकालावेळी राहुल नार्वेकर यांनी केलेल्या विधानांचा ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी समाचार घेत हल्लाबोल केला आहे.

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा निकाल दिला. यावेळी 2018 साली पक्षाच्या घटनेत केलेले बदल ग्राह्य धरले जाणार नसून 1999 साली निवडणूक आयोगाला सादर केलेली घटनाच स्वीकारली जाईल, असं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं. तसेच, 23 जानेवारी 2018 साली संघटनात्मक अंतर्गत निवडणुका झाल्या नसल्याचे प्रतिपक्षाकडून पुराव्यानिशी सिद्ध केलं गेलं, असंही राहुल नार्वेकर यांनी म्हंटलं होते. या विधानांचा ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी समाचार घेत नार्वेकरांवर हल्लाबोल केला आहे.

अरविंद सावंत म्हणाले की, २०१३ साली ही निवडणूक झाली त्यात उद्धव ठाकरे हे अध्यक्ष झाले. त्याच बैठकीत हा फोटो बघा त्यात स्वतः राहुल नार्वेकर आमच्या सोबत दिसतील. ही बाकी नंतर जन्माला आलेली माणसे आहेत. १९९९ वर जाता, पण २०१३ वर जाता येत नाही. हे अशोभनीय आहे किती खोटं बोलले. हे २०१८ चा सुद्धा पत्र बघा, असे म्हणत त्यांनी मोबाईलमध्ये काही फोटो दाखविले. लंडनमधील एका वकिलांनी हे स्क्रिप्ट लिहून दिली ते सुद्धा अडखळत अध्यक्ष वाचत होते, असाही निशाणा त्यांनी नार्वेकरांवर साधला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com