Shinde Vs Bjp : भाजपच्या बड्या नेत्याने केला शिवसेनेच्या मतदारसंघावर दावा ; वातावरण तापणार ?

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना आणि भाजप आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
Published by  :
Team Lokshahi

सांगली: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना आणि भाजप आमने-सामने येण्याची शक्यता आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आगामी 2024 ची विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार असणाऱ्या अनिल बाबर यांच्या सांगलीच्या खानापूर विटा मतदारसंघातून गोपीचंद पडळकर विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.

अनिल बाबर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर आमदार असून आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर महायुतीतील असणारे भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर आमदार आहेत. मात्र पडळकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिंदे गटाचे आमदार अनिल बाबारांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवला आहे.

2024 ची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवायचा निर्धार आमदार पडळकर यांनी खानापूरच्या तामखडे येथे एका रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी केला आहे. तसेच कार्यकर्त्यांना त्या दृष्टीने कामाला लागायच्या सूचना देखील यावेळी आमदार पडळकर यांनी दिल्या आहेत. महायुतीच्या विधानसभेच्या जागा वाटपा आधीच आमदार पडळकर यांनी खानापूर-विटा मतदारसंघातुन निवडणूक लढवण्याच्या केलेल्या घोषणेमुळे शिंदे गट शिवसेना विरुद्ध भाजपा असा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com