BMC News: पालिका रुग्णालयात आणीबाणी, वितरकांकडून औषध पुरवठा बंदचा इशारा
मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयासह विविध रुग्णालयात औषध पुरवठा करणाऱ्या औषध पुरवठादाराचे 120 कोटी रुपये थकवले आहेत. मुंबई महापालिका जोपर्यंत औषध पुरवठादाराची थकीत रक्कम देत नाही, तोपर्यंत औषध पुरवठा बंद करणार असल्याचा इशारा ‘ऑल फूड अँड ड्रग्स लायसन्स होल्डर’ने दिला आहे.
मात्र यामुळे पालिकेच्या 27 रुग्णालयांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी आज सोमवार, 13 जानेवारीपासून पालिका रुग्णालयात आणीबाणी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून याला पालिका प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा `लायसन्स होल्डर`चे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले.
अभय पांडे - ऑल फूड ड्रॅग असोसिएशन अध्यक्ष
वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये आणि दवाखान्यांना औषधांचा पुरवठा करणाऱ्या वितरकांची सुमारे १२० कोटी रुपयांची देयके मुंबई महानगरपालिकेने चार महिन्यांपासून थकवली आहेत. देयके थकवल्यामुळे वितरकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. परिणामी, वितरकांनी तातडीने देयके मंजूर न झाल्यास आज पासून औषधांचा पुरवठा बंद करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेला दिला आहे.