बदलापुरात ५ वर्षात ७०० कोटींचा भ्रष्टाचार? भाजपने काढली ५ वर्षांची श्वेतपत्रिका
थोडक्यात
बदलापुरात ५ वर्षात ७०० कोटींचा भ्रष्टाचार?
भाजपने काढली नगरपालिकेची ५ वर्षांची श्वेतपत्रिका
प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप
खोटे ठराव आणि कामं दाखवून पैसे लाटल्याचा दावा
बदलापूर नगरपरिषदेत मागील ५ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत तब्बल ७०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे यांनी पालिकेची मागील ५ वर्षांची श्वेतपत्रिका तयार केली असून त्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा भ्रष्टाचार केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
बदलापूर नगरपरिषदेत एप्रिल २०२० पासून प्रशासकीय राजवट आहे. मागील ५ वर्ष निवडणुकाच झाल्या नसल्यानं पालिकेवर अधिकारी राज आहे. यात नगरपरिषदेकडे १२०० कोटी रुपये उपलब्ध असताना प्रशासकीय खर्च आणि काही झालेली, काही अर्धवट कामं यांचा खर्च वगळता ७०० कोटी रुपये पालिकेकडे शिल्लक असायला हवे होते. मात्र आज पालिकेकडे कर्मचाऱ्यांचा पगार आणि ठेकेदारांची बिलं द्यायलाही पैसे नाहीत. याचं कारण म्हणजे खोटे ठराव आणि खोटी कामं दाखवून काही ठेकेदारांच्या संगनमताने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ७०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपचे जिल्हा महामंत्री आणि माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केला आहे.
बदलापूर नगरपरिषदेचं २०२० ते २०२५ या ५ वर्षातलं उत्पन्न, खर्च, एफडी, रखडलेली कामं, पूर्ण झालेली कामं, शासनाकडून आलेला निधी या सगळ्याचा लेखाजोखा मांडणारी बदलापूर पालिकेची श्वेतपत्रिका त्यांनी प्रसिद्ध केली आहे. ही श्वेतपत्रिका नागरिकांपर्यंत पोहोचवणार असून ५ वर्षात बदलापूर पालिकेत कसा भ्रष्टाचार झाला, हे समोर आणणार असल्याचं संभाजी शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं अधिकारी वर्ग अडचणीत येण्याची शक्यता आहे.