देवेंद्र फडणवीसांकडून अजित पवारांना खास गिफ्ट

राजकारण म्हटलं की विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात नेहमी संघर्ष दिसतो... मात्र, राजकारणात काही असेही नेते असतात ज्यांची मैत्री ही राजकारणाच्या पलीकडची असते...

राजकारण म्हटलं की विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात नेहमी संघर्ष दिसतो... मात्र, राजकारणात काही असेही नेते असतात ज्यांची मैत्री ही राजकारणाच्या पलीकडची असते... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे- शरद पवार, गोपीनाथ मुंडे-विलासराव देशमुख यांची मैत्री प्रसिद्ध होती...आता देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांची मैत्री प्रसिद्ध आहे... 7 ऑगस्टला येणाऱ्या मैत्री दिनापुर्वी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मित्राला खास गिफ्ट दिले...

सत्ता गेल्यानंतर मंत्र्यांना शासकीय घर रिकामे करावे लागते. पण गेली अडीच वर्षे उपमुख्यमंत्री पदावर काम करत असताना अजित पवार यांना देवगिरी बंगला मिळाला होता. शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर अजित पवार विरोधी पक्षनेते बनले. अजित पवार यांनी देवगिरी बंगला कायम राहावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आणि अजित पवारांची विनंती देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली.

देवगिरी बंगला उपमुख्यमंत्री किंवा ज्येष्ठ मंत्र्यांना दिला जातो. मात्र प्रथमच हा विरोधी पक्षनेत्यास देण्याचा निर्णय झाला आहे. यापुढे तो पायंडा पडणार नाही या अटीवर निर्णय झाल्याचे आदेशात म्हटले आहे. यापुर्वी ठाकरे सरकार 2019 मध्ये बनले तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्नीचे कार्यालय व मुलीच्या शाळेची सोय म्हणून जवळचा सागर बंगला मिळावा, अशी मागणी केली होती. अर्थात ती अजित पवारांनी तेव्हा मान्य केली होती.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचाही वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे 22 जुलै रोजी येतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांनाच्या काळात सिंचन घोटाळा प्रकरणात भाजपकडून सातत्याने त्यांच्यांवर टीका होत होती. परंतु फडणवीसांनी त्यांना सांभाळून घेतले. महाराष्ट्र साखर झोपेत असतांना दोघांनी नोव्हेंबर 2019 मध्ये राज्यपालांकडे जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. परंतु शरद पवारांनी अजित पवारांचे बंड मोडून काढले...अन् दोन मित्र एकत्र राहू शकले नाही...

Lokshahi
www.lokshahi.com