2025 वर्षात एमएमआरडीए अंतर्गत कोणती कामे पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश
वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मुंबईतील प्रलंबित मेट्रोची कामे पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
मुंबईमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ची बैठक संपन्न झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या कामांचा तसेच प्रत्येक मेट्रो मार्गाचा आढावा घेतला. मेट्रोचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या आहेत. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माधुरी मिसाळ उपस्थित होते.
मेट्रो ३ ची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. २०-२५ किलोमीटरचा हा मार्ग पूर्ण झाल्यास मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. तसेच २०२५ मध्ये इंदू मील स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
मेट्रो ३ मार्गिका १०० दिवसांत पूर्ण होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे. मेट्रो ३ चा मार्ग बीकेसी ते अत्रे चौक वरळीपर्यंत असणार आहे. इथून पुढे कुलाब्यापर्यंत जाणार आहे. मेट्रो ३ (अ) मुळे दररोज १०-१५ लाख प्रवासी प्रवास करतील. मेट्रो ३ पूर्ण झाल्यावर दररोज २५-३० लाख प्रवासी प्रवास करतील. त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.