J J Hospital Robotic Surgery : जेजे रुग्णालयात पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी पार

जेजे रुग्णालयात पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी, मोफत उपचाराने रुग्णाला दिलासा.
Published by :
Prachi Nate

राज्य सरकारच्या सर जे. जे. रुग्णालयात बुधवारी रोबोटने पहिली शस्त्रक्रिया केली. रोबोटिक शस्त्रक्रिया करणारे जे. जे. हे पहिले सरकारी रुग्णालय आहे. ज्या रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयांत तीन ते पाच लाख रुपयांदरम्यान खर्च येतो, ती शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली आहे. डोंबिवलीचे शंकर परब यांच्यावर ही रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांना काही महिन्यांपासून हर्नियाचा त्रास होता.

शस्त्रक्रियेसाठी त्यांना जे. जे.च्या जनरल सर्जरी विभागात दाखल केले होते. ही रोबोटिक शस्त्रक्रिया जनरल सर्जरी विभागाचे प्रमुख आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तर डॉ. गिरीश बक्षी, डॉ. अमोल वाघ, डॉ. सुप्रिया भोंडवे आणि डॉ. काशिफ अन्सारी यांनी सहभाग घेतला. जेजेतील पहिल्या 500 रोबोटिक शस्त्रक्रियांचा सर्व खर्च 'रोबो' पुरविणारी कंपनी करणार आहे. त्यामुळे त्यासाठी फार काही खर्च रुग्णांना करावा लागणार नाही. सध्या खासगी रुग्णालयांतच रोबोटिक शस्त्रक्रिया केल्या जातात.

शस्त्रक्रियेनंत परब म्हणाले की, मला फारशा वेदना होत नाहीत. दोन दिवसांत डिस्चार्ज मिळणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च आला असता, पण जेजेमध्ये ती मोफत करण्यात आली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com