Sanjay Raut : ‘काँग्रेसच्या भीतीतून मुक्त व्हा’ राऊतांचा मोदींवर निशाणा!

काँग्रेसच्या भीतीतून मुक्त व्हा असा सल्ला देत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि सरकारवर टीकास्त्र सोडले.
Published by :
Team Lokshahi

महाराष्ट्रासारखं मोठं राज्य हे या देशातील गुंडगिरीचा सगळ्यात मोठा अड्डा झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री गुंडाना पोसत आहेत. पोलिस स्टेशनमध्ये त्यांचे (भाजप) आमदार गोळीबार करत आहेत, या सगळ्या विषयांवर पंतप्रधान मोदी काही बोलले का? देशातील समस्यांवर मोदी काहीच बोलले नाही. तासाभराच्या भाषणात निम्मा वेळ तर मोदी फक्त काँग्रेसवर टीका करत होते. नेहरू, इंदिरा गांधीवर टीका करत राहिले. काँग्रेसच्या भीतीतून मुक्त व्हा असा सल्ला देत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि सरकारवर टीकास्त्र सोडले.

पुण्यातील गुंड निलेश घायवळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या फोटोवरून पुन्हा एकदा संजय राऊत यांनी शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एक निवृत्त पोलीस अधिकारी वर्षावर रोज गुंड टोळ्यांच्या बैठका घडवून आणत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “ यापुढे मी रोज असे फोटो ट्विट करत राहणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गुंड टोळ्या भेटून काय चर्चा करत आहेत. विरोधकांचे मुडदे पाडण्यासाठी मदत करणार आहात का? मुख्यमंत्र्यांच्या मुलाला भेटायला गुंडांची रांग लागली आहे. वर्षावर रोज गुंड टोळ्यांच्या बैठका होत आहेत. एक निवृत्त पोलीस अधिकारी हे घडवून आणतोय. नेहरूंनी देश आळशी बनवला, तर तुम्ही काय करताय? गुंड टोळ्यांच्या हातात देश देताय का? असा प्रश्न यावेळी राऊत यांनी उपस्थित केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com