Ravindra Jadeja | Balasaheb Thackeray
Ravindra Jadeja | Balasaheb Thackeray Team Lokshahi

जाडेजाने केला बाळासाहेबांचा व्हिडिओ शेअर; म्हणाला, वाघ बोलतो ऐका...

'अजूनही वेळ आहे, समजून घ्या गुजरातींनो' असं कॅप्शन जाडेजानं लिहिलं आहे.

सध्या देशात गुजरात विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच गुजरात निवडणुकीत सर्वात अधिक चर्चेत असलेले उमेदवार म्हणजे, रिवाबा जाडेजा. रिवाबा जाडेजा या प्रसिद्ध क्रिकेटर रवींद्र जाडेजा याची पत्नी आहे. तिकीट मिळाल्यापासूनच रिवाबा चर्चेत आहेत. पण यावरुन जाडेजा कुटुंबात मात्र मोठी फूट दिसतेय. जाडेजाची पत्नी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतेय. तर रवींद्र जाडेजाची मोठी बहिण मात्र काँग्रेसचा प्रचार करताना दिसतेय. तसेच, यामध्ये रवींद्र जाडेजा आपल्या पत्नीच्या बाजूनं तर त्याचे वडिल आपल्या मुलीच्या बाजूनं असल्याचं पाहायला मिळत आहे.

अशातच निवडणुकीच्या रणधुमाळीत रवींद्र जाडेजाच्या एका ट्वीटची जोरदार चर्चा सुरु आहे. रवींद्र जाडेजानं बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच, हा व्हिडीओ ट्वीट करताना 'अजूनही वेळ आहे, समजून घ्या गुजरातींनो' असं कॅप्शन जाडेजानं लिहिलं आहे. जाडेजाच्या या ट्वीटनंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ही निवडणूक केवळ पंतप्रधान मोदींचा हवाला देऊन लढवली जात आहे का? असेही प्रश्न सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून विचारले जात आहेत. 

नेमकं का म्हणाले होते बाळासाहेब ठाकरे असं?

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ग्रोधा दंगल झाली होती. प्रचंड हिंसाचार घडला होता. गुजरातमध्ये झालेल्या दंगलीनंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांनी नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला होता.

लालकृष्ण आडवाणी यासंदर्भात बाळासाहेब ठाकरे यांना मातोश्रीवर भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी नरेंद्र मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यास विरोध केला होता. नरेंद्र मोदी गेले, तर गुजरातही भाजपच्या हातून जाईल, असा सल्ला आडवाणींना दिला होता, असं बाळासाहेब ठाकरे त्यांच्या भाषणात सांगत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com