संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पुण्यातून अटक
बीड: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील दोन प्रमुख आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर तीन आरोपी फरार झाले होते. त्यातील दोघांना आज अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे हत्येच्या तपासाला महत्त्वाची कलाटणी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तपास चालू असून, उर्वरित आरोपींविरोधातही कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एकूण सात आरोपींविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना काल रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता कृष्णा आंधळे हा एक आरोपी फरार आहेत. कृष्णा आंधळेच्या अटकेसाठी विशेष पथक मागावर असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, ३१ डिसेंबरला वाल्मिक कराड याने पुण्यातील मुख्यालयामध्ये सरेंडर केले होते. त्यानंतर त्याला १४ जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. आता कराडची चौकशी सुरू असताना सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक झाल्याने आता सीआयडी आणि एसआयटीलाही या प्रकरणाच्या मास्टरमाईंडपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.