Walmik Karad च्या मर्जीतील पोलिसांची यादी तृप्ती देसाई यांनी केली शेअर
अंजली दमानिया यांच्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनीही मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे एक यादी शेअर केली आहे. या यादीत वाल्मिक कराडच्या मर्जीतील पोलिसांची नावं असल्याचा दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे.
बीड जिल्ह्यात वाल्मिक कराडचे निकटवर्तीय आणि मर्जीतील पोलीस अधिकारी मोठ्या प्रमाणावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी गृहमंत्री फडणवीसांकडे रीतसर तक्रारही दिली आहे. तसंच यादीतील पोलिसांच्या नावाची चौकशी करून त्यांची बदली जिल्ह्याबाहेर करण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.
काय म्हणाल्या तृप्ती देसाई?
बीड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून काही अधिकारी वाल्मिक कराडच्या मर्जीनुसार काम करतात. किंवा त्यांच्या नजीकचे अधिकारीही आहेत, त्यांची यादी मी जाहीर करतेय. गृहमंत्र्यांना मी विनंती करते की ही केस आणि या पुढील प्रकरणांचा तपास पारदर्शकपणे होणे गरजेचं आहे. वाल्मिक कराड टोळीचा पर्दाफाश करणं किंवा ते थांबवायचं असेल तर या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बदली बीड जिल्ह्याच्या बाहेर करणं गरजेचं आहे. गृहमंत्र्यांनी या सर्व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.